रांची, 25 ऑगस्ट : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विधानसभा सदस्यत्वावर टांगती तलवार असल्याचं समोर आलं आहे. निवडणूक आयोगाने राज्यपालांना हेमंत सोरेन यांची सदस्यता रद्द करण्यासंबंधित आपलं मत पाठवलं आहे. यादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल रमेश बैस दिल्लीहून रांचीला पोहोचलेही आहेत.
रांची एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर जेव्हा मीडियाने त्यांना निवडणूक आयोगाच्या रिपोर्टबाबत विचारलं तर ते म्हणाले की, मला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मी दिल्लीमध्ये एम्समधून उपचार घेण्यासाठी गेलो होतो. राजभवनावर पोहोचल्यानंतर याबाबत माहिती घेईन, असं म्हणून त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.
दिल्लीतही 'ऑपरेशन लोटस'? 'आप'चे अनेक आमदार नॉट रिचेबल; अरविंद केजरीवालांनी बोलावली बैठक
सोरेन म्हणतात...
याबाबत माहिती मिळताच झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन म्हणाले की, मला असं वाटतं की, भाजपच्या नेत्यांसह त्यांचे खासदार आणि त्यांचं समर्थन करणाऱ्या पत्रकारांनी स्वत: निवडणूक आयोगाच्या रिपोर्टचा मसूदा तयार केला आहे.
मुख्यमंत्री सोरेन यांच्यावर काय आहेत आरोप?
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दार यांनी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दावा केला होता की, सोरेन यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग गेला आहे आणि यात हितसंबंध आणि भ्रष्टाचार या दोन्हींचा समावेश आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या वादाची दखल घेत निवडणूक आयोगाने मे महिन्यात सोरेन यांना खाण भाडेतत्त्वावर घेण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.