श्रीनगर, 19 जुलै : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आयसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेचं अस्तित्व असल्याचं सिद्ध झालं आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य कासीम खुरासानी (Kasim Khurasani) आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांच्या अटकेनंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेचं (Indian Intelligence agencies) खुरासानी आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या हालचालींवर गेल्या वर्षभरापासून बारीक लक्ष होतं. खुरासानी काश्मीरमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 च्या एप्रिल महिन्यात आयसीसच्या मॉड्युलचा संस्थापक उमर निसार भट उर्फ कासीम खोरासानीला एका मेसेजिंग ऍपवरून गुप्तचर यंत्रणांनी ट्रॅक केलं होतं. आपल्या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करण्यासाठी तो काश्मीरमध्ये आला होता. खुरासानी हा अफगाणिस्तानमध्ये असल्याचा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात तो काश्मीरमध्ये असल्याचा सुगावा भारतीय गुप्तचर यंत्रणांना लागला होता. अनंतनाग जिल्ह्यातील एका छोटेखानी शहरात राहून तो संघटनेच्या सदस्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ नावाचं एक छोटेखानी नियतकालिक चालवत असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. यासाठी त्यानं एक टेलिग्राम ग्रुप तयार केला होता आणि त्यातील सदस्यांच्या तो संपर्कात होता. टेलिग्रामवरूनच त्याची संभाषणं ट्रेस करून त्याचा ठावठिकाणा पोलिसांनी शोधला आणि त्याच्या सर्व कारवायांवर पाळत ठेवली होती. हे वाचा - पाच वेळा हँडसेट बदलूनही हँकिंग सुरुच राहिलं - प्रशांत किशोर नवे आव्हान काश्मीरबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान आक्रमक वक्तव्यं करत असताना आता आयसीसच्या प्रवेशामुळे भारताची चिंता वाढणार आहे. त्यातच अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्यानं माघार घेतल्यानंतर आता सुमारे 85 टक्के भूभाग तालिबाननं आपल्या ताब्यात घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भारताची चिंता अधिकच वाढली आहे. एका बाजूला आक्रमक असणारा चीन आणि दुसऱ्या बाजूला दहशतवाद यांच्यासह आता आयसीसचाही सामना भारतीय सुरक्षा यंत्रणांना करावा लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.