प्रयागराज, 11 नोव्हेंबर : भर वस्तीतल्या घरात घुसून दिवसा उजेडी एका तरुणाच्या हत्येचा प्रयत्न झाल्याने प्रयागराज शहरात खळबळ उडाली होती. घरात मुलं एकटीच असताना दरोडा घालण्याचा प्रयत्न झाला, असं सुरुवातीला सांगण्यात येत होतं. पण ही घटना पोलीस इन्स्पेक्टरच्याच घरात घडली आणि पोलिसाच्या मुलालाच गोळ्या घातल्या गेल्या. त्यामुळे घटनेतलं गूढ वाढलं होतं. हल्लेखोर कोण याचा तपास पोलिसांनी अडीच तासांत केला. सख्ख्या बहिणीनेच भावावर वडिलांच्या सरकारी रेव्हॉल्व्हरमधून गोळ्या घातल्याचं उघड झालं आहे.
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज शहर या घटनेनं हादरून गेलं आहे. अवघ्या 15 वर्षांच्या मुलीने आपल्या भावावर असा हल्ला का केला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. जखमी अवस्थेतल्या भावाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलगी अद्याप नजरकैदेत घरातच आहे आणि पोलीस पुढची चौकशी करत आहेत.
आझमगढ ठाण्यात तैनात असणाऱ्या इन्स्पेक्टर सभाजीत सिंह यांच्या घरात ही घटना घडली. दुपारी बहीण भावाची काहीतरी कारणावरून भांडणं झाली आणि त्यानंतर बहिणीनं वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधूनच 17 वर्षांच्या भावावर तीन गोळ्या झाडल्या. तिने बाहेर येऊन घरात दरोडा पडला असल्याचा बनाव केला. काही दागिन्यांची चोरी झाल्याचं तिने सांगितलं.हल्लेखोरांनी घर लुटण्याचा प्रयत्न केला. आम्ही विरोध केल्यावर त्यांनी भावाला गोळ्या मारल्याचं तिने सांगितलं. पोलीस घडनास्थळी पोहोचले. भावाला रुग्णालयात दाखल केलं आणि बहिणीकडे हल्लेखोरांविषयी चौकशी करू लागले. तिच्या बोलण्यात विसंगती वाटल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी पोलिसी खाक्यात चौकशी केल्यावर या अल्पवयीन बहिणीने आपणच गोळ्या झाडल्याचं कबूल केलं आहे.
आता पोलीस तिच्याकडे अधिक चौकशी करत आहेत. कुठल्या कारणाने तिने भावाचा जीव घेण्याचं पाऊल उचललं याबाबत गूढ कायम आहे. जखमी भावावर उपचार सुरू आहेत. या मुलीकडून रिव्हॉल्वर आणि काही दागिने जप्त करण्यात आले आहेत.