मुंबई, 25 जून : आजचा 25 जूनचा दिवस भारताच्या इतिहासात महत्त्वाचा दिवस आहे. 1975 साली याच दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणीची घोषणा केली होती. ही आणीबाणी 21 मार्च 1977 पर्यंत चालली. आजपासून बरोबर 44 वर्षांपू्वी घडलेली ही घटना अजूनही वादग्रस्त आहे.
आणीबाणीमध्ये व्यक्तींचे मूलभूत अधिकार आणि त्यासोबतच माध्यमांच्या स्वातंत्र्याचाही गळा घोटला गेला. विरोधी पक्षांच्या नेत्यांना बराच काळ तुरुंगात राहावं लागलं. देशभरातच सगळ्यांची मुस्कटदाबी झाली.
अलाहाबाद कोर्टाचा निर्णय
12 जून 1975 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींच्या विरोधात दिलेला एक निर्णय या आणीबाणीसाठी कारणीभूत ठरला, असं बोललं जातं. रायबरेलीच्या निवडणूक प्रचारात सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याप्रकरणी इंदिरा गांधींना हायकोर्टाने दोषी ठरवलं होतं. ही निवडणूकही कोर्टाने रद्द ठरवली होती. त्याशिवाय इंदिरा गांधींवर सहा वर्षं निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली होती. त्या कोणत्याही पदावर राहू शकत नव्हत्या. या निर्णयानंतरच इंदिरा गांधींनी आणीबाणी लादण्याचा निर्णय घेतला.
आणीबाणीची 44 वर्षे; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ
तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहम्मद यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या शिफारसीवरूनच आणीबाणीची घोषणा केली. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या कलम 352 नुसार ही आणीबाणीची घोषणा करण्यात आली. 26 जूनला इंदिरा गांधी स्वत: रेडिओवरून आणीबाणीचा निर्णय जाहीर केला.
इंदिरा गांधीविरोधात एकजूट
त्यावेळेस इंदिरा गांधी विरुद्ध सर्व विरोधी पक्ष असं चित्र निर्माण झालं होतं. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष एकत्र आले होते. त्यांनी इंदिरा गांधींपुढे आव्हान निर्माण केलं होतं. यामुळे इंदिरा गांधींच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.
त्यातच इंदिरा गांधींच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या मनातल्या भीतीला खतपाणी घातलं. असं म्हणतात की या दिवसाची योजना सहा महिने आधीच बनली होती. 8 जानेवारी 1975 रोजी सिद्धार्थ शंकर रे यांनी इंदिरा गांधींना आणीबाणीची पूर्ण योजना मांडणारं पत्र लिहिलं होतं. या पत्रात लिहिल्याप्रमाणे तत्कालीन कायदे मंत्री एच. आर. गोखले, काँग्रेस अध्यक्ष देवकांत बरुआ आणि बॉम्बे काँग्रेसचे अध्यक्ष रजनी पटेल यांच्यासोबत झालेल्या बैठकीतच ही योजना ठरली होती.
देशभरात असंतोष
इंदिरा गांधींच्या या निर्णयामुळे देशभरात प्रचंड असंतोष निर्माण झाला. जयप्रकाश नारायण यांच्याच नेतृत्वाखाली आणीबाणीविरोधात आंदोलन उभं राहिलं. या आंदोलनात सगळे महत्त्वाचे नेते तुरुंगात डांबले गेले.
देशभरातून ही आणीबाणी हटवण्यासाठी दबाव होता. त्याचबरोबर जगभरातूनही इंदिरा गांधींवर टीका होऊ लागली. परिस्थिती हाताबाहेर जाते आहे, असं वाटल्यानं अखेर इंदिरा गांधींनी 21 मार्च 1977 ला आणीबीणी उठवली.
यानंतर 1977 मध्येच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींचं पानिपत झालं आणि जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. स्वातंत्र्यानंतर आलेलं हे पहिलंच बिगरकाँग्रेस सरकार होतं.
===========================================================================================
VIDEO: पाणी बिलाच्या थकबाकीवर मुख्यमंत्री म्हणाले...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा