नवी दिल्ली 5 फेब्रुवारी : पर्यावरणव संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg's Tweet) हिने भारतात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून ती चांगलीच चर्चेत आली आहे. यामुळे ग्रेटाचा सोशल मीडिया मॅनेजर असलेल्या केरळमधील आदर्श प्रतापलादेखील धमक्यांचे फोन येऊ लागले आहेत. मुळचा केरळचा असलेला आदर्श (Social Media Manager of Greta) हा ग्रेटाचे सोशल मीडिया अकाऊंट सांभाळतो. त्यामुळं, या शेतकरी आंदोलनाबाबतही त्यानंच ग्रेटाला माहिती दिली असल्याचं म्हटलं जात आहे.
ग्रेटाच्या ट्विटनंतर आदर्शदेखील सोशल मीडियावर चांगलाच निशाण्यावर आला आहे. त्याचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्नदेखील झाला आहे. दरम्यान याच विषयावर न्यूज 18 सोबत बोलताना आदर्श म्हणाला, मी 2017-18 संयुक्त राष्ट्रात हवामान बदल परिषदेत युवा पत्रकार म्हणून काम पाहायचो. माझं कामं फक्त इतकंच आहे, की ग्रेटा जे काही लिहिते ते रिपोस्ट करणं. त्यात मी स्वतःच्या मनाचं काहीही लिहित नाही.
हवामान बदलांवर संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेच्या वेळी आदर्श आणि ग्रेटाची भेट झाली. यानंतर ग्रेटाचे मत मांडण्यासाठी फेसबुक पेज तयार केले गेले. पुढे तिचे फॉलोवर वाढत गेले आणि मी तिच्या पोस्ट रिपोस्ट करू लागलो. जागतिक हवामान बदलांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं ध्येय आहे. मी तिच्या वैयक्तिक मतांमध्ये हस्तक्षेप करत नाही, असं स्पष्टीकरण आदर्शनं दिलं.
ग्रेटानं शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात केलेल्या ट्विटमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. ग्रेटा थनबर्गने मंगळवारी रात्री टि्वट केले. भारतातील शेतकरी आंदोलनाच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असे तिने म्हटले होते. ग्रेटानं दुसऱ्या एका ट्विटमध्ये एक डॉक्युमेंट शेअर केलं होतं. त्यामध्ये भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठीची रणनीती नमूद करण्यात आली होती. भारतावर पाच टप्प्यांमध्ये दबाव करण्याचा उल्लेख यामध्ये होता. ग्रेटानं हे ट्विट थोड्या वेळात डिलीट केलं.
पहिलं ट्विट डिलीट केल्यानंतर ग्रेटानं एक अपडेटेड टूलकिट शेअर केलं होतं. या नव्या टूलकिटमध्ये अनेक बदल केले गेले होते. २६ जानेवारीला भारतासह परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना यातून हटवण्यात आली होती. तसंच जर तुमची मदत करण्याची इच्छा असेल तर हे अपडेटेड टूलकिट आहे. मागील डॉक्युमेंट मी हटवलं आहे, कारण ते जुनं होतं, असं ग्रेटानं टूलकिटसोबतच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer protest, Greta Thunberg