अहमदाबाद, 12 ऑगस्ट : कोरोना प्रतिबंधक लस (anti covid vaccine) टोचून घ्यायला नकार देणाऱ्या एका कर्मचाऱ्याची (employee) हकालपट्टी (terminate) केल्याची माहिती भारतीय वायूदलाकडून (Indian Airforce) गुजरात उच्च न्यायालयाला (Gujrat High Court) देण्यात आली आहे. वायूदलातील सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेणं हे बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र तरीही देशातील वायूदलाच्या 9 कर्मचाऱ्यांनी ही लस टोचून घेण्यास नकार दिला आहे. त्यातील एकाला सेवेतून बरखास्त करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडून न्यायालयात देण्यात आली आहे.
वायूसेनेचे कॉर्पोरल योगेंद्र कुमार यांच्या याचिकेवर बुधवारी भारताच्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल देवांग व्यास यांनी न्ययालयात बाजू मांडली. यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना प्रतिबंधक लस टोचून न घेतलेल्या 9 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली होती. त्यापैकी 8 जणांची त्याला उत्तरे आली, मात्र एका कर्मचाऱ्याने त्या नोटिसीला उत्तरही दिले नाही. त्यामुळे त्याच्यावर बरखास्तीची कारवाई कऱण्याचा निर्णय वायूदलाने घेतला आहे.
असा आहे नियम
वास्तविक, कोरोना प्रतिबंधक लस टोचून घ्यायची की नाही, हा प्रत्येकाच्या निवडीचा भाग आहे. सर्वसामान्य नागरिकांना ही लस टोचून न घेण्याचा निर्णय़ घेण्याचंही स्वातंत्र्य आहे. मात्र वायूदलात काम करण्यासाठी हा अत्यावश्यक निकष आहे. त्यामुळे सेवेच्या ज्या साधारण नियम आणि अटी असतात, त्यात आता कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतलेली असणं, या बाबीचाही समावेश करण्यात आला आहे. या अटींची पूर्तता न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
हे वाचा -सोनिया गांधींनी बोलावली विरोधकांची बैठक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार उपस्थित
न्यायालयाचा सबुरीचा सल्ला
बरखास्तीची कारवाई झाल्यानंतर या कर्मचाऱ्याने नोटिशीला उत्तर दिल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. त्यानुसार या उत्तराचा विचार करावा आणि कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून न टाकता त्याला आणखी संधी देण्याबाबत विचार करण्यात यावा, असा सल्ला गुजरात हायकोर्टाने दिला आहे. आता वायूदलाकडून याबाबत काय निर्णय घेतला जातो, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.