मराठी बातम्या /बातम्या /देश /सावधान! भारतात जुलै, ऑगस्टमध्ये पुन्हा होऊ शकतो करोनाचा उद्रेक

सावधान! भारतात जुलै, ऑगस्टमध्ये पुन्हा होऊ शकतो करोनाचा उद्रेक

नवी दिल्ली 27 एप्रिल: भारतात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. मात्र जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे असं म्हटलं जातं. सरकारच्या उपायांमुळे ही परिस्थिती नियंत्रणात आली तरीही लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलंय. जुलै किंवा ऑगस्टमध्ये हा उद्रेक होऊ शकतो असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

लॉकडाऊनमुळे कोरोनाचा वेग कमालीचा मंदावला आहे. पण लॉकडाऊन किती काळ सुरू ठेवावा यालाही काही मर्यादा आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा सगळे व्यवहार सुरळीत होतील तेव्हा काही दिवसांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. त्यावेळी पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू शकते असं मत नाडर विद्यापीठाचे असोसिएट प्राध्यापक अमित भट्टाचार्य यांनी व्यक्त केलंय.

चीनमध्येही अशाच प्रकारचा अनुभव आला असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. 25 मार्चा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यावेळी देशात 618 कोरोनाबाधित रुग्ण आणि 13 जणांचा मृत्यू झाला होता. तर आज म्हणजे 27 एप्रिलला कोरोनाबाधितांची संख्या 28,380वर गेली असून मृत्यूचा आकडा 886वर गेला आहे.

हे वाचा - CM उद्धव ठाकरे यांच्यासाठी मंत्रिमंडळाने घेतला हा मोठा निर्णय, पेच सुटणार?

लॉकडाऊन हटविल्यानंतर जर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं काटेकोर पालन झालं तरच त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते अन्यथा नाही असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान,  कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नाश कधी होणार? कोरोनाव्हायरसवर प्रभावी उपचार कधी येणार? याची प्रतीक्षा संपूर्ण जगाला आहे. जगभरातील शास्त्रज्ञांचे यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. अशात जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation) शास्त्रज्ञांनी अशी शक्यता वर्तवली आहे की,  कोरोनाव्हायरसची लस वर्षभरात येईल मात्र तोपर्यंत हा आजार सामान्य तापासारखा होईल.

हे वाचा -  लॉकडाऊन जरी संपला तरी मे महिन्यात 13 दिवस बँका बंद, त्यानुसार करा कामाचं नियोजन

WHO च्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन (Soumya Swaminathan) यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे.

सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं, "व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर 3 महिन्यांतच 7 लसींचं ह्युमन क्लिनिकल ट्रायल सुरू झालं आहे. जर सर्वकाही सुरळीत झालं आणि आपल्याला नशीबानं साथ दिली तर 9 ते 12 महिन्यांत कोरोनाव्हायरसविरोधातील लस आपल्याकडे असेल आणि असं झालं, तर शास्त्रज्ञांसाठी हे अभूतपूर्व असं यश असेल. पुरेशा लोकांमध्ये अँटिबॉडीज किंवा लसीकरणामार्फत व्हायरसविरोधात लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होईल आणि हा आजार तितका धोकादायक राहणार नाही"

First published:

Tags: Coronavirus