नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : देशभरामध्ये 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असला तरीही यावर्षी त्यावर कोरोनाचे सावट आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर सॅनिटायझेशन आणि इतर खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात लहान मुलांऐवजी यंदा कोरोना वॉरियर्स सहभागी झाले आहेत. तसंच कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. दरम्यान या काळामध्ये लस कधी येणार असा सवाल वेळोवेळी उपस्थित केला जात आहे. यावर पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘कोरोना व्हॅक्सिन कधी तयार होणार असा सवाल विचारला जात आहे. वैज्ञानिक यासाठी सातत्याने मेहनत घेत आहे. देशामध्ये 3 लशी विविध टप्प्यामध्ये आहेत. कोरोनाची लस लवकरात लवकर भारतीयांपर्यंत पोहोचेल याची सर्व तयारी झाली आहे. प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी रुपरेखा तयार आहे. आज भारतामध्ये एक नाही, दोन नाही तर तीन-तीन व्हॅक्सिन यावेळी टेस्टिंगच्या टप्प्यामध्ये आहेत.’ यावेळी पंतप्रधानांनी असे आश्वासन दिले की जसे वैज्ञानिकांकडून लशीकरता हिरवा कंदिल मिळेल त्यावेळी मोठ्या स्तरावर या व्हॅक्सिनचे उत्पादन करण्याची देशाची तयारी आहे. (हे वाचा- PM मोदींनी मोडला अटलजींचा रेकॉर्ड, पाहा लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाचे खास PHOTOS ) त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाच्या डिजीटल हेल्थ मिशन (Digital Health Mission) ची आज घोषणा केली. आजपासून या मिशनची सुरुवात होत असून आरोग्य क्षेत्रासाठी ही मोठी क्रांती असेल असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, नागरिकांचा उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, त्यासाठी प्रत्येकाला एक आरोग्य आ़यडी दिले जाईल. संबंधित नागरिकाच्या स्वास्थ्याबाबत त्यात माहिती असेल. यामुळे त्याला उपचार घेणे सोपे होईल. या अभिनयानाअंतर्गत उपचारामध्ये येणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुविचारीत पद्धतीने विचार करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हेल्थ आयडी प्रत्येक भारतीयाच्या स्वास्थ्य खात्याप्रमाणे काम करेल. यातून अनेक उपचारासंबंधित समस्या सोडवल्या जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.