हैदराबाद, 25 एप्रिल : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, हैदराबाद पोलिसांनी एका रेसिडेन्शियल अपार्टमेंट सोसायटीमधील काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका महिला डॉक्टरला बिल्डिंगमध्ये येण्यापासून रोखल्याचा आरोप या लोकांवर ठेवण्यात आला आहे. संबंधित महिला डॉक्टर हैदराबादमधील कोविड 19 रुग्णालयात कार्यरत आहे. आरोग्य विभागाशी संबंधित लोकांनी हा प्रकार तेलंगणाचे आरोग्यमंत्री ई राजेंद्र यांच्यासमोर मांडला. पोलिसांनी भादवि कलम 188, 341, 509 आणि 506 अंतर्गत लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिला डॉक्टरने वनस्थलीपुरम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसात दिलेल्या तक्रारीत महिला डॉक्टरनं म्हटलं आहे की, बुधवारी अपार्टमेंट रेसिडेंट असोसिएशनच्या लोकांनी तिच्यासोबत बेशिस्त वर्तन केलं. त्याशिवाय अपशब्दही वापरले आणि बिल्डिंगमध्ये प्रवेशही दिला नाही. महिला ऑर्थोपेडिक सर्जन असून बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या त्यांच्या भावाकडे निघाल्या होत्या. हे वाचा : कोरोनामुळे चार महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आई वडील शेवटचं पाहू शकले नाही सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असताना सोसायटीच्या बिल्डिंगमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे बिल्डिंगमध्ये आलेल्या महिला डॉक्टरला आत जाण्यापासून रोखण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली. हे वाचा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत ‘या’ राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश कायम संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.