भारताच्या सायबर आर्मीबद्दल माहीत आहे का? चीनच्या हल्ल्याला तगडं उत्तर द्यायला सज्ज

भारताच्या सायबर आर्मीबद्दल माहीत आहे का? चीनच्या हल्ल्याला तगडं उत्तर द्यायला सज्ज

मिसाईल करू शकणार नाही, असं काम सायबर आर्मी (Indian cyber Defence) करू शकते. भारतीय सायबर आर्मीचं काम कसं चालतं? ती कुठे तैनात असते आणि कोण काम करतं या सेनेत? जाणून घ्या भारताच्या (Cyber Army) सायबर आर्मीविषयी...

  • Share this:

संजय श्रीवास्तव

नवी दिल्ली, 18 सप्टेंबर

सध्याच्या सायबर युगात आर्मी, नेव्ही, एअरफोर्सबरोबर प्रत्येक देशाची स्वतःची एक सायबर सुरक्षा यंत्रणा असते. त्याचप्रमाणे भारताची देखील एक सायबर यंत्रणा असून सर्व प्रकारच्या इ- हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची क्षमता या आर्मीमध्ये आहे. दिल्लीत मुख्यालय असलेल्या भारतीय सायबर आर्मीचं काम कसं चालतं? ती कुठे तैनात असते आणि कोण काम करतं या सेनेत? जाणून घ्या भारताच्या सायबर आर्मीविषयी...

आजच्या या आधुनिक जगात हत्यारांबरोबरच सायबर सुरक्षेला देखील मोठं महत्त्व आहे. भारताच्या सायबर आर्मीची स्थापना ही नोव्हेंबर 2019 मध्ये करण्यात आली असून तिन्ही सैन्यदलामधील सैनिकांची यामध्ये भरती करण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या अतिशय संवेदनशील माहितीचं या सायबर आर्मीच्या माध्यमातून सरंक्षण होत असून विरोधकांच्या हल्ल्याला जबरदस्त उत्तर ही आर्मी देते.

या आर्मीचे प्रमुख कमांडर रिअर अॅडमिरल मोहित गुप्ता आहेत. ही फौज केवळ भारताच्या माहितीची सुरक्षाच करत नाही तर ऑनलाईन हल्ल्याला प्रत्युत्तर देखील देते.

चीन आणि पाकपासून सायबर धोका

चीनसारखा देश सतत भारताची माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र भारताची सायबर आर्मी या हल्ल्यापासून देशाला वाचवून आपल्या देशाचा महत्वाचा डेटा वाचवण्याचा प्रयत्न करते. पाकिस्तान आणि चीनशी संबंधित असणारे अनेक ग्रुप भारतावर सायबर हल्ले करत असतात. यापासून वाचण्यासाठी भारताला सायबर सुरक्षेची आणि आर्मीची गरज होती. त्यामुळे मागील काही वर्षांपासून भारताचा यावर अभ्यास सुरू होता. पाकिस्तान आणि चीनमधील या सायबर ग्रुपला त्यांच्या सरकारचा अप्रत्यक्षपणे पाठिंबा असतो. त्यामुळे हा चोरलेला डेटा ते सरकारलाच विकत असतात.

सायबर हल्ला झाला तर काय होईल?

भारताच्या संरक्षण, वीज, वाहतूक आणि राजनैतिक क्षेत्राशी संबंधित माहितीवर डल्ला मारायचा प्रयत्न सायबर हल्लेखोर काही काळापासून करत आहेत. आतापर्यंत भारतीय सायबर सेनेने हे हल्ले परतवले आहेत. पण असा प्रत्यक्ष सायबर हल्ला झाला तर मोठं नुकसान होऊ शकतं. संपूर्ण यंत्रणा निकामी करण्याची क्षमता सायबर हल्ल्यात असते. त्यामुळे एका सेकंदात दैनंदिन कामंसुद्धा ठप्प होऊ शकतात. विचार करा, तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये हल्लेखोर व्हायरसच्या रूपाने घुसला तर काय होईल? संपूर्ण सरकारी यंत्रणा हादरवून टाकायची आणि सर्वसामान्यांपर्यंत थेट झळ बसेल अशी कामं करायची या सायबर हल्लेखोरांकडे क्षमता असते.

कधी झाली स्थापन?

मागील काही वर्षांपासून भारताच्या डिफेंस, एनर्जी, ट्रान्सपोर्ट, पॉवरग्रिड, तसेच स्ट्रॅटेजिक माहितीच्या ठिकाणी सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भारताला हे सायबर हल्ले परतवून लावण्यासाठी तयार असणं गरजेचं आहे. भारत सरकारने यासाठी 2011 मध्येच यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात हे शक्य झालं नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कामाने वेग घेतला आणि त्यानंतर काही वर्षांतच या सायबर आर्मीची स्थापना झाली.  नोव्हेंबर 2019 पासून ही सायबर आर्मी कार्यरत आहे.

मिसाईल करू शकत नाही ते काम करते सायबर आर्मी

या सायबर आर्मीची वैशिष्ट्यं म्हणजे जे काम मिसाईल करू शकणार नाही ते काम सायबर आर्मी करू शकते. त्यामुळे भारत सरकारच्या अनेक कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले झाल्यानंतर आता हे हल्ले रोखण्याचं कामही सायबर आर्मी करत आहे. मागील काही वर्षांपासून भारताच्या महत्त्वाच्या वेबसाईटवर होणारे हल्ले थांबले आहेत. मागील वर्षी याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधी सप्टेंबर 2018 मध्ये रिअर ऍडमिरल मोहित गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या सायबर आर्मीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर देशभरातील विविध मोठ्या आयटी कंपन्यांची मदत घेऊन सायबर आर्मी मजबूत करण्यात आली. या कंपन्यांकडून योग्य मार्गदर्शन घेऊन नोव्हेंबर 2019 मध्ये या आर्मीच्या मुख्य कामाला सुरुवात झाली.

कोण काम करतं सायबर आर्मीत?

या सायबर आर्मीमध्ये तिन्ही दलांच्या सैनिकांबरोबरच रॉ, नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन, डिफेन्स इंटेलिजंट एजन्सी, नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इंफ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिसर्च टीमचा देखील सहभाग आहे. त्यामुळे सर्वच विभाग एकत्र येऊन काम करत असल्याने सायबर आर्मी मोठ्या प्रमाणात मजबूत होत आहे. मागील वर्षी भारताने सायबर युद्ध अभ्यास देखील केला होता. यालाच सायबोरेक्स देखील म्हटलं जात.

सायबोरेक्स म्हणजे काय

या युद्ध अभ्यासात तिन्ही दलांच्या बरोबरच देशभरातील विविध संस्थांनी देखील सहभाग नोंदवला होता. यामध्ये नॅशनल सेक्युरिटी काउन्सिल, सिक्रेटिइट,नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, कॉम्प्युटर रिसर्च सेंटरचा देखील समावेश होता. सर्वात महत्वाचं म्हणजे या सायबर एजन्सीकडे मोठ्या प्रमाणात अधिकार देखील असतात. यामध्ये कोणतंही नेटवर्क हॅक करण्याचे अधिकार देखील त्यांच्याकडे असतात. त्यामुळं जगभरातील कुठूनही सायबर हल्ला झाला तरी ते शोधून काढायचं काम ते करू शकतात.

चीनची सायबर आर्मीसुद्धा बलाढ्य

चीनच्या पारंपरिक सैन्याबरोबरच सायबर सैनिकही खूप सक्षम आहेत. चीनची सायबर आर्मी अनेक वर्षं काम करत आहे आणि बलाढ्य आहे. या सगळ्यात तरबेज असून त्यांनी आपल्या पाच कमांडमध्ये एक सायबर आर्मी ठेवली आहे. त्यामुळं आपल्या सायबर आर्मीपेक्षा ते सक्षम असून वायुदल, भूदल, नौदल, स्पेस कमांड याचबरोबर चीनच्या सैन्यात सायबर दल देखील आहे. त्यामुळं त्यांनी सैन्याच्या इतर विभागांबरोबरच सायबर दलाला देखील तितकेच महत्व दिलं आहे. सध्या जगभरात चीनची सायबर आर्मी सगळ्यात मोठी आणि मजबूत असून कोणत्याही देशावर ते सायबर हल्ला करू शकतात.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 18, 2020, 8:10 PM IST

ताज्या बातम्या