FAIR गेला आता फक्त GLOW दिसणार; 45 वर्षांनी हिंदुस्तान युनिलिव्हरचा मोठा निर्णय

FAIR गेला आता फक्त GLOW दिसणार; 45 वर्षांनी हिंदुस्तान युनिलिव्हरचा मोठा निर्णय

हिंदुस्ताने युनिलिव्हर (Hindustan Unilever) आपल्या सर्वात मोठ्या Fair & Lovely ब्रँडचं नाव बदललं आहे.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : आपल्या लहानपणापासून आपण फेअर अँड लव्हलीची (Fair & Lovely) जाहिरात पाहत आलो आहोत. आपल्या घरातही कुणी ना कुणी तरी ही क्रिम वापरतंच. फक्त महिलाच नव्हे तर पुरुषांच्याही सर्वाधिक पसंतीचं असलेला हा ब्रँड. मात्र आता याचं फेअर अँड लव्हलीमधील फेअर जाऊन आता ग्लो आला आहे. आता Fair & Lovely नाही तर Glow & Lovely असणार आहे.

वर्णभेदारून झालेल्या टिकेनंतर हिंदुस्ताने युनिलिव्हर (Hindustan Unilever) आपल्या सर्वात मोठ्या Fair & Lovely ब्रँडचं नाव बदललं आहे. तर खास पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या स्क्रिन क्रिमचं नाव Glow & Handsome असं असेल. गेल्याच महिन्यात कंपनीने आपण आपल्या ब्रँडचं रिब्रँडिग करणार असल्याची घोषणा केली होती.

1975 साली म्हणजे 45 वर्षांपूर्वी हिंदुस्तान युनिलिव्हरने एक गोरं करणारी क्रिम म्हणून फेअर अँड लव्हली लाँच केली होती. मात्र फेअर अँड लव्हलीमधील फेअर या शब्दामुळे गोरेपणा आणि उजळपणावर जास्त भर दिला जातो आहे. त्यामुळे कंपनीवर अनेकदा रंगभेद करत असल्याची, गोरेपणाच्या आकर्षणाचा व्यापार करत असल्याची टीकाही झाली. त्यामुळे आता आपल्या या ब्रँडचं नाव बदललं आहे.

हे वाचा - FAIR & LOVELY तील 'फेअर' घालवण्यासाठी लढली ही मुंबईची मुलगी

फेअरनेस क्रिमवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. फेअरनेस क्रिमच्या अशा जाहिराती, मार्केटिंग करून वर्णभेदाला प्रोत्साह दिलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवर टिकेची झोड उठली आहे. फेअर अँड लव्हली तर आधीपासूनच अशा वादात अडकलं होतं.

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर पुन्हा वर्णभेदाचा वाद उफाळून आला. ब्लॅक लाइव्हज मुव्हमेंट सुरू झाली. त्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपल्या स्किन व्हाइटनिंग उत्पादनांची विक्री थांबवली. भारतातही त्याचे परिणाम दिसून आले. हिंदुस्तान युनिलिव्हरच्या फेअर अँड लव्हलीविरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आला. ज्याला अनेकांनी पाठिंबा दिला आणि हिंदुस्तान युनिलिव्हरने फेअर अँड लव्हलीमधील फेअर शब्द काढण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा - घाम आणि दुर्गंधीच नाही तर आता कोरोनालाही शरीरापासून दूर ठेवणार Deodorant

सौंदर्य फक्त गोरेपणाशी किंवा उजळपणापुरतंच मर्यादित नाही. त्यामुळे फेअरनेस, व्हाइटनिंग, लाइटनिंग असे शब्दच हिंदुस्थान लिव्हरच्या स्कीन केअर उत्पादनांमध्ये नसणार आहेत, असं कंपनीने सांगितलं आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरनंतर L'Oreal या मोठ्या कॉस्मेटिक कंपनीनेही आपल्या स्किन केअर प्रोडक्टमधून व्हाइट, फेअर आणि लाइट हे शब्द हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: July 2, 2020, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading