श्रीनगर, 14 जानेवारी: मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातील लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे श्रीनगर याठिकाणी असणारा डल तलावही गोठला आहे. आज श्रीनगरमधील तापमान उणे 8 अंशांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या 29 वर्षातील हे तापमान सर्वात कमी तापमान असल्याची माहिती समोर येते आहे. रात्री देखील श्रीनगरमधील तापमान उणे 8.4 होते.
दरम्यान डल लेक गोठल्यानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये आपण पाहू शकतो की या तलावात विहार करणाऱ्या बोटीबाहेर बर्फावर एक मनुष्य उभा आहे. तर ती बोट पुढे नेण्यासाठी चक्क बर्फ फोडावा लागतो आहे. सर्वत्र आच्छादलेला बर्फ हे दृश्य जरी विलोभनीय असलं तरीही श्रीनगरमधील लोकांसाठी हा प्रसंग कठीण आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आरोग्यविषयक समस्यांना देखील सामोरं जावं लागतं आहे. श्रीनगरने गेल्या 29 वर्षातील सर्वाधिक थंडीची रात्र अनुभवली आहे.
(हे वाचा- रतन टाटांचा आणखी एक PHOTO व्हायरल, कारण वाचून तुम्हीही कराल त्यांच्या साधेपणाला सलाम)
काश्मीर खोऱ्यात इतर ठिकाणीही थंडीच प्रमाण वाढलं आहे. Pahalgam टूरिस्ट रिसॉर्ट हा अमरनाथ यात्रेसाठीचा दक्षिण काश्मीरमधील बेसकॅम्प आहे. याठिकाणी सर्वात किमान तापमान 11.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते तर रात्री याठिकाणी तापमान 11.7 अंश सेल्सिअस झाले होते.
हाड गोठवणारी थंडी पडल्यामुळे डल तलावासह अनेक भागातील पाण्याचे क्षेत्र गोठले आहे. श्रीनगरमध्ये कमीतकमी तापमान झाल्याने याठिकाणी पाणीपुरवठा करणारे पाईप्सही गोठले आहेत. शहरात आणि काश्मीर खोऱ्यात इतरत्र अनेक ठिकाणी रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांना रहदारीसाठी देखील समस्या येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir, Srinagar