भागलपूर, 28 जानेवारी : छातीत वेदना होत असल्याने केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे धाकटेभाऊ निर्मल चौबे यांना बिहारमधल्या भागलपूरमधल्या मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; पण डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी बराच गोंधळ घातला. दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी केली. त्यानंतर दोन डॉक्टर्सना निलंबित करण्यात आलं. पोलिसांनी कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
निर्मल चौबे यांच्या छातीत वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना मायागंज रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. त्यांच्यावर रुग्णालयातल्या आयसीयूमध्ये उचार सुरू होते; पण बराच वेळ तिथले डॉक्टर आलेच नाहीत, असा आरोप नातेवाईकांनी केला. अचानक निर्मल यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत कळताच नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. आयसीयूमध्ये ड्युटी असताना दोन डॉक्टर तिथं हजर नसल्याचा आरोप करण्यात आला.
हे ही वाचा : प्रोटीनने भरपूर असते कुळीथ डाळ, किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी प्रभावी
याबाबत बोलताना निर्मल यांचे पुत्र नीतेश चौबे म्हणाले, की शुक्रवारी (27 जानेवारी) सायंकाळी चार वाजता त्यांच्या वडिलांच्या छातीत प्रचंड वेदना होत होत्या. श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यांना तत्काळ डॉ. एम. एन. झा यांच्या युनिटमध्ये भरती करण्यात आलं. तिथं गेल्यानंतर डॉक्टरच उपलब्ध नव्हते. नंतर दुसऱ्या एका डॉक्टरने निर्मल यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचं सांगून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यास सांगितलं.
अटेंडंट बीपी मशीनबद्दल होती अनभिज्ञ
नीतेश यांनी वडिलांना रुग्णालयात दाखल केलं, तेव्हा तिथं डॉक्टर उपलब्ध नव्हते. तिथल्या अटेंडंटला बीपी मशीनबद्दलही काहीही माहिती नव्हतं. त्याच वेळी निर्मल याची प्रकृती बिघडत चालली होती. परंतु त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. अखेर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निर्मल यांनी अखेरचा श्वास घेतला. तेव्हा रुग्णालयात गोंधळ सुरू झाला. रुग्णालयाचे इमर्जन्सी इन्चार्ज डॉ. महेश कुमार व रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. असीम कुमार दास यांना नातेवाईकांच्या संतापाचा सामना करावा लागला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. लेखी तक्रार मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं. ड्युटीवर हजर नसलेल्या दोन्ही डॉक्टर्सना निलंबित करण्यात आलं आहे. रात्री 9.45 वाजता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तणाव निवळला.
रुग्णालय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे निर्मल यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. नातेवाईक आणि युवा मोर्चाच्या नेत्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला होता. त्यांचा गोंधळ पाहून आयसीयूतल्या नर्स आणि इतर कर्मचारी पळून गेले. रुग्णालयातल्या इतर रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागला. परिस्थिती सांभाळण्यासाठी घटनास्थळी आयसीयू विभागाचे डॉ. महेश कुमार दाखल झाले होते.
हे ही वाचा : राजस्थानमध्ये फायटर जेट कोसळून अपघात; ...तर घडली असती मोठी दुर्घटना
नातेवाईकांचा संताप पाहता त्यांना रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचं लिहून द्यावं लागलं. रुग्णालयाचे अधीक्षक आले तेव्हा नातेवाईकांनी त्यांनाही घेराव घातला होता. अधीक्षकांनाही या संतापाचा सामना करावा लागला. रोष पाहता रुग्णालयाच्या अधीक्षकांनी सायंकाळी ड्युटीवर असणाऱ्या व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकणारे विद्यार्थी डॉ. विनय कुमार आणि ज्युनिअर निवासी डॉ. आदित्य वेद्वय यांना निलंबित केले. लेखी तक्रार प्राप्त झाल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस उपअधीक्षकांनी दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Heart Attack, Heartbreaking