वाराणसी 09 एप्रिल : उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात शुक्रवारी आरोग्य विभागाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. शामलीमध्ये तीन वृद्ध महिला कोरोना लस (Corona Vaccine) घेण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना न विचारताच या वृद्ध महिलांना अॅन्टी रेबीज लस (Anti Rabies Vaccine) दिली. यानंतर यातील एका महिलेची प्रकृती बिघडली. पीडितांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे तक्रार केली असून ज्यांनी चुकीची लस दिली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. सीएचसी कांधलामध्ये गुरुवारी मोहल्ला सरावज्ञान येथील निवासी असलेली महिला सरोज (वय 70), रेल्वे मंडी येथील रहिवासी अनारकली ( वय 72) आणि सत्यवती (वय 60) कोरोनाची लस घेण्यासाठी गेल्या होत्या. येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी बाहेरील मेडिकल स्टोअरमधून दहा- दहा रुपयांच्या सिरिंजची मागणी केली आणि तिघींनाही लस देऊन घरी जाण्यास सांगितलं. काही वेळाने सरोज यांना चक्कर येऊ लागली आणि अस्वस्थ वाटू लागलं. कुटुंबीयांनी त्यांना खासगी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांना चिठ्ठी दाखवल्यानंतर लक्षात आलं, की त्यांना कोरोना नाही तर अॅन्टी रेबीज लस देण्यात आली आहे. अन्य दोन वृद्ध महिलांनाही याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही लसीची चिठ्ठी दाखवली. यावेळी समोर आली की त्यांनाही अॅन्टी रेबीज लस देण्यात आली आहे. सध्या शामलीचे डीएम जसजित कौर यांनी संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली आहे. डीएमनं सीएमओ आणि एसीएमओ यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपावला आहे. तसेच पीडित महिलांची निवेदने नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. डीएमच्या म्हणण्यानुसार, चौकशीनंतर दोषी आरोग्य कर्मचार्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दुसरीकडे, सीएमओ डॉ संजय अग्रवाल यांचं म्हणणं आहे, की याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.