लखनऊ 24 मे : डीजेवर डान्स करायला जवळपास सगळ्यांनाच आवडतं. मात्र, कधीकधी यावेळी झालेला थोडासा निष्काळजीपणाही जीवावर बेतू शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील एका घरात आनंदाचं वातावरण होतं. लोक आनंदात नाचत होते, त्याचवेळी घरातील एक मुलगीही नाचू लागली. मात्र डीजे म्युझिकवर नाचणाऱ्या या मुलीचे केस जनरेटरच्या फॅनमध्ये अडकले आणि त्यानंतर ती पूर्णपणे अडकली. ही घटना सैदाबाद गावात घडल्याचं सांगण्यात येत आहे. तिचे केस जनरेटरमध्ये अशा प्रकारे अडकले की तिच्या डोक्याच्या त्वचेलाही ओरखडे आले आणि शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला. यानंतर मुलीच्या डोक्याला सुमारे 700 टाके घालण्यात आले. मात्र, आता ती शुद्धीवर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंदाच्या क्षणी, जेव्हा सर्व नातेवाईक आणि मुली डीजेच्या तालावर नाचत होते, तेव्हा ती मुलगी देखील या क्षणाचा आनंद घेण्यासाठी पोहोचली आणि नाचू लागली. मात्र एका छोट्याशा चुकीमुळे तिचे केस जनरेटरमध्ये अडकले आणि ती आत ओढली गेली.
कोणीतरी तिचे केस जोरात ओढल्यासारखं तिला वाटलं आणि ती त्याच वेळी बेशुद्ध झाली. ती शुद्धीवर आली तेव्हा थेट रुग्णालयात होती आणि तिची प्रकृती गंभीर होती. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांनी तिला गावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मुलीच्या मोठ्या बहिणीचं लग्न काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे, मात्र आता घरातील वातावरण गंभीर बनलं असून लग्न शांततेत पार पाडण्याचा विचार आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिच्या उपचाराला बराच वेळ लागेल. डोक्यावरील त्वचा जास्त सोलल्यामुळे स्थिती गंभीर आहे. जखम बरी झाल्यानंतरच तिच्या डोक्यावरचे केस पुन्हा येतील की नाही हे समजेल.डॉक्टरांच्या मते, हे 4-5 महिन्यांनंतरच कळेल. गरिबीमुळे मुलीचे सीटी स्कॅन अद्याप झालेले नाही. मुलीच्या उपचारासाठी वडिलांना पैशांची गरज असून मुलीचे लग्नही तोंडावर आले आहे. मात्र, कुटुंबातील नातेवाईक मदतीसाठी पुढे आले आहेत.