प्रयागराज, 9 मे : ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) आणि विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple) प्रकरणी सुरू असलेल्या वादावर महत्त्वपूर्ण निकालासंदर्भात सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. हे प्रकरण सुनावणीसाठी पुढे न्यायचं का यासंदर्भातलाच निकाल आला आहे. ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) परिसरातल्या शृंगार गौरीच्या दर्शन आणि नियमित पूजेला परवानगी द्यावी यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी योग्य आहे की नाही यावर वाराणसी कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली आहे. हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल देत कोर्टाने या प्रकरणी २२ सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे शृंगार गौरीच्या पूजेच्या अधिकारासाठी दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने सुनावणीस योग्य मानली आहे. ज्ञानवापी संकुलात असलेल्या शृंगार गौरीसह इतर धार्मिक स्थळांवर नियमित पूजा करण्यास परवानगी देण्याची मागणी हिंदूंच्या वतीने करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण न्यायालयात टिकवून ठेवता येत नाही, असा युक्तिवाद करत मुस्लीम पक्षाने हे प्रकरण बरखास्त करण्याची मागणी केली होती. मुस्लीम बाजूचा युक्तिवाद फेटाळून लावत न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलं आहे की, या प्रकरणाची सुनावणी नागरी प्रक्रिया संहितेच्या आदेश 07 नियम 11 अंतर्गत होऊ शकते. अयोध्येनंतर आता काशीची पाळी आहे का? कारण काही दिवसांपासून वाराणसीमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. कारण आहे काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीचा वाद. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग असल्याचा दावा करण्यात आला होता. ती विहीर असल्याचं मुस्लीम समाजाचं म्हणणं होतं. त्यामधल्या कारंजाला शिवलिंग म्हटलं जातंय, असा त्याचा दावा आहे. वादग्रस्त जागेवर नेहमीच मशीद होती किंवा सुमारे चारशे वर्षांपूर्वी मंदिर पाडून तेथे मशीद बांधण्यात आली होती या वादावर वाराणसी न्यायालयच निर्णय घेईल. परंतु, त्याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयाने वाराणसी न्यायालय या खटल्याची सुनावणी करू शकेल की नाही हे ठरवायचे होते, ज्यात वादग्रस्त जागा हिंदूंच्या ताब्यात देऊन त्यांना तेथे पूजा करण्याची परवानगी देण्याची मागणी 31 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. काय होतं मशिदीच्या जागी? वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराजवळ ज्ञानवापी मशीद आहे. सध्या इथं मुस्लिम समाज दिवसातून पाच वेळा सामूहिक नमाज अदा करतो. ही मशीद अंजुमन-ए-इंतजामिया समिती चालवते. 1991 मध्ये स्वयंभू देवता विश्वेश्वर भगवान यांच्या वतीने वाराणसीच्या दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जात दावा करण्यात आला आहे की, ज्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद आहे, तेथे पूर्वी विश्वेश्वराचे मंदिर असायचे आणि शृंगार गौरीची पूजा केली जात असे. मुघल शासकांनी हे मंदिर तोडून येथे मशीद बांधली होती. अशा परिस्थितीत ज्ञानवापी संकुल मुस्लिमांच्या ताब्यातून रिकामे करून हिंदूंच्या ताब्यात द्यावे. त्यांना शृंगार गौरीची पूजा करण्याची परवानगी द्यावी. वाराणसी न्यायालयाने या अर्जाचा काही भाग मंजूर केला आणि काही फेटाळला. न्यायालयाने कोणताही निकाल थेट देण्याऐवजी सविस्तर सुनावणी घेण्याचे ठरवले. ज्ञानवापी मशीद चालवणाऱ्या अंजुमन-ए-इंतजामिया समितीने 1998 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्वयंभू धर्मगुरू विश्वेश्वरच्या या अर्जाला विरोध केला होता. वाराणसी न्यायालयात सुरू होणाऱ्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती केली. मशीद कमिटीच्या वतीने कोर्टात असा युक्तिवाद करण्यात आला की, 1991 मध्ये बनवण्यात आलेल्या केंद्रीय धार्मिक पूजा कायदा 1991 नुसार ही याचिका कायम ठेवण्यायोग्य नाही आणि ती फेटाळण्यात यावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.