अहमदाबाद, 25 डिसेंबर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी नागरिकत्व कायदा योग्य असल्याचे सांगताना मुस्लिमांसाठी जगात 150 इस्लामिक देश आहेत. ते कोणताही निवडू शकतात पण हिंदुंसाठी फक्त भारतच एकमेव देश आहे असं वक्तव्य केलं. साबरमती आश्रमाबाहेर नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत भाषण करताना मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस याबाबतीत महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या इच्छांचा आदर राखत नसल्याचं रूपाणी म्हणाले. रूपाणी यांनी म्हटलं की, पाकिस्तानमध्ये फाळणीवेळी 22 टक्के हिंदू होते. आता छळ, बलात्कार, अत्याचार यामुळे ही लोकसंख्या कमी होऊन फक्त 3 टक्के इतकी राहिली आहे. यासाठी हिंदूंना भारतात परत यायचं आहे. आम्ही तेच काम करत आहे जे काँग्रेसने करायला हवं होतं. आता आम्ही करत आहे तर तुम्ही का विरोध करत आहात. बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या फक्त 2 टक्के इतकी असल्याचंही विजय रूपाणी म्हणाले.
देशात वेगवेगळ्या भागात नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाविरुद्ध गुजरात भाजपचे नेते आणि सरकारमधील मंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील रॅलीमध्ये भाग घेतला. सुरतमध्ये गुजरातचे वनमंत्री गणपत वसावा सहभागी झाले होते. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांशेजारी या रॅलींचे आयोजन केलं होतं. सुरतचे खासदार दर्शना जरदोश आणि आमदार पुर्नेश मोदी, विवेक पटेल यांनीही नव्या कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीमध्ये भाग घेतला होता. पुर्नेश मोदी म्हणाले की, CAA देश आणि नागरिकांच्या हितासाठी आहे. विरोध करताना काँग्रेस या कायद्याची मोडतोड करत आहे. लोकांची दिशाभूल केली जात आहे. या खोट्या प्रचाराच्या विरोधात नागरिक समितीने ही रॅली काढली असल्याचं पुर्नेश मोदींनी सांगितलं. NRC आणि NPR वर काय म्हणाले अमित शहा, पाहा VIDEO