मराठी बातम्या /बातम्या /देश /एक विवाह असाही : मांडवातच वधूचा मृत्यू; बाजूच्या खोलीत मृतदेह ठेवून लहान बहिणीशी लग्नगाठ

एक विवाह असाही : मांडवातच वधूचा मृत्यू; बाजूच्या खोलीत मृतदेह ठेवून लहान बहिणीशी लग्नगाठ

आई-वडिलांनीही दुःख बाजूला ठेवत एका मुलीचा मृतदेह समोर असतानाच दुसऱ्या मुलीला सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला.

इटावा, 3 जून : लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाची घटना असते. या मंगलप्रसंगाच्या आठवणी आयुष्यभर साठवून ठेवल्या जातात. या दिवसाबाबत नववधू आणि नवऱ्यामुलाच्या बऱ्याच इच्छा-आकांक्षा असतात. दोघांनी नव्या सहजीवनाविषयी खूपशी स्वप्नं रंगवलेली असतात. मात्र, कधी-कधी दुर्दैवानं अशा आनंदाच्या प्रसंगाचं अचानकपणे दुःखाच्या डोंगरात रूपांतरही होऊ शकतं, असाच काहीसा प्रकार सुरभीच्या लग्नात घडला.

ही दुःखद कहाणी आहे, उत्तर प्रदेशमधील इटावामधल्या भरथना इथली. इथल्या भागातील नवली गावात राहणाऱ्या मंगेश कुमार यांनी आपली मुलगी सुरभीचं लग्न समसपूरमधील मुलाशी करण्याचं निश्चित केलं होतं. मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी दिवसरात्र धावपळ करणाऱ्या बापाला शत्रूवरही येऊ नये, अशा प्रसंगाला सामोरं जावं लागलं. नवीन वैवाहिक आयुष्याचं स्वप्न रंगवणाऱ्या सुरभीनंही असं काही भयंकर घडेल, अशी कल्पनाही केली नव्हती.

लग्नाच्या दिवशी मैत्रिणी, बहिणी आणि इतर नातेवाईक महिलांच्या गराड्यात सुरभी नववधूच्या पेहरावात नटून-थटून लग्नमंडपाच्या दिशेनं एक-एक पाऊल टाकत निघाली होती. मात्र, ती त्या मांडवात पोहोचल्यानंतर तिची सर्व स्वप्नं क्षणातच संपून गेली. निपचित पडलेल्या सुरभीला तपासून डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. एकाएकी आलेल्या हृदय विकाराच्या झटक्यानं नववधू सुरभीच्या मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. सगळं होत्याचं नव्हतं झालं. नवरदेवही सुन्न झाला. सर्व नातेवाईक मंडळी, वरातीतून नवरीला घरी घेऊन जाण्यासाठी आलेले लोक जागीच थिजले. आई-वडिलांच्या दुःखाला तर पारावारच उरला नाही. काही वेळापूर्वीच्या आनंदाच्या हसऱ्या वातावरणाची स्मशानशांतता बनली. काय करावं, ते कुणालाच सुचेना.

हे वाचा - भारतात सुरू होणार 8 नवीन उड्डाण प्रशिक्षण अकादमी; महाराष्ट्रातील ‘या’ शहराचा समावेश

अखेर काही सुज्ञ, समजूतदार आणि पोक्त लोकांनी या परिस्थितीवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. काही वेळाच्या चर्चेअंती नवरदेवाचं मृत सुरभीच्या धाकट्या बहिणीशी लग्न करण्याचा विचार समोर आला. मोठा समजूतदारपणा दाखवत नवरदेव आणि सुरभीची धाकटी बहीण निशा यांनीही या विचाराला होकार दिला. आई-वडिलांनीही दुःख बाजूला ठेवत एका मुलीचा मृतदेह समोर असतानाच दुसऱ्या मुलीला सासरी पाठवण्याचा निर्णय घेतला. सर्वांनीच जड अंतःकरणानं हे लग्न पार पाडलं.

हे वाचा - गृहप्रवेशाच्या 24 तासातच घर आगीच्या भक्ष्यस्थानी, घरात ही वस्तू ठेवताना 10 वेळा विचार करा

सुरभीचा भाऊ सौरभने सांगितलं की, सुरभी आम्हाला अशा प्रकारे सोडून गेल्यानंतर पुढं काय करावं, हे कोणालाच समजत नव्हतं. मग कुणीतरी सुचवलं की, माझी लहान बहीण निशाचं याच मांडवात नवरदेवाशी लग्न करून द्यावं. आम्ही सर्वजण यावर सहमत झालो. सुरभीचा मृतदेह एका खोलीत ठेवण्यात आला. तर, दुसऱ्या खोलीत धाकट्या बहिणीच्या लग्नाची तयारी चालू होती. लग्नानंतर निशा सासरी निघून गेल्यानंतर सुरभीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आम्हा सगळ्यांसाठीच हा अत्यंत कठीण प्रसंग होता.

First published:

Tags: Marriage, Uttar pardesh, Uttar pradesh news