लखनऊ, 21 एप्रिल : कानपूरच्या बिकरू गावात 8 पोलिसांची हत्येमुळे चर्चेत आलेल्या गँगस्टर विकास दुबेच्या एन्काऊंटरप्रकरणी (Gangster vikas dubey encounter case) उत्तर प्रदेश पोलिसांना अखेर क्लीन चिट देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती बी.एस. चौहान समितीने आपल्या अहवालात यूपी पोलिसांना क्लीन चीट दिली आहे. आठ महिन्यांच्या तपासणीनंतर समितीला कोणताही साक्षीदार सापडला नाही, पोलिसांनी एन्काऊंटर जाणीवपूर्वक केल्याचा किंवा फेक एन्काऊंटर (Fake encounter) असल्याचे तपासातून स्पष्ट झालेले नाही, असे समितीने सांगितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तपासादरम्यान न्यायमूर्ती बी.एस. चौहान यांनी अनेक पोलिसांकडे चौकशी केली. मात्र, एन्काऊंटर बनावट असल्याचे सिद्ध करण्यासाठी समितीला एकही सबळ पुरावा मिळाला नाही. पुराव्याअभावी विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांना क्लीन चिट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 2 जुलै 2020 च्या रात्री विकास दुबे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिकेरू गावी गेलेल्या पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 8 पोलीस शहीद झाले. यानंतर पोलिसांनी कारवाईत त्याच्या चार कार्यकर्त्यांना ठार मारले. परंतु, मुख्य आरोपी विकास दुबे फरार झाला. 9 जुलै रोजी विकास दुबे नाट्यमयरित्या उज्जैनच्या महाकाळ मंदिरात शरण आला. यानंतर उज्जैनहून परत येत असताना पोलिसांची गाडी पलटी झाली, त्यानंतर विकास दुबेने पोलिसांचे पिस्तूल घेऊन पळ काढला. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना त्याने पोलिसांवरच गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि चकमकीत विकास दुबेचा मृत्यू झाला. अखेर न्यायालयीन चौकशीतही हा एन्काऊंटर योग्य मानला गेला आहे. हे वाचा - Beed News: बीडच्या शेतकऱ्याची परदेशात कमाल! द्राक्षं पोहचली थेट युरोपच्या बाजारपेठेत कसा घडला एनकांऊटर - अटक केल्यानंतर विकास दुबेला एसटीएफच्या गाडीतून कानपूरला आणले जात होते. पावसामुळं रस्ता काहीसा निसरडा झाला होता. बर्रा येथे असताना भरधाव वेगात असलेली पोलिसांची कार अचानक उलटली. या अपघातात दुबेसह काही पोलीस जखमी झाले. जखमी अवस्थेतही दुबे पळण्याची संधी शोधत होता. ही संधी मिळताच त्यानं एका पोलीस अधिकाऱ्याचं पिस्तूल हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला इशारा देत शरण येण्याचं आवाहन केलं. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळं पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. त्यात दुबे जागीच ठार झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.