मुंबई, 24 ऑगस्ट : माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांचं निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. एक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. याशिवाय अरुण जेटली यांचं नाव घेतलं की अस्खलित इंग्रजीत, नर्मविनोदी शैलीत भाषण करणारे जेटली आठवतात. भारतीय राजकारणातलं एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून अरुण जेटली सगळ्यांच्याच स्मरणात राहतील. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये अरुण जेटलींनी अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. 2014 ते 2019 या काळात ते अर्थमंत्री होते. नोटबंदी आणि GST ते अर्थमंत्री असतानाच मोदी सरकारने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अमलबजावणीची जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्याच कारकिर्दीमध्ये GST चं विधेयकही मांडण्यात आलं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातला एक दिग्गज अनुभवी चेहरा अशी त्यांची ओळख होती. मोदी सरकारच्या स्थापनेनंतर अरुण जेटली यांच्याकडे अर्थमंत्रिपदासोबतच काही काळ संरक्षण मंत्रिपदाचीही जबाबदारी होती. नंतर मनोहर पर्रिकर यांच्याकडे ती जबाबदारी सोपवण्यात आली. मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अरुण जेटलींनी तब्येतीच्या कारणामुळे मंत्रिमंडळात सामील व्हायला नकार दिला. त्यांच्यानंतर निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. वाजपेयी सरकारमध्येही मंत्री अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिलं. वाजपेयी सरकारच्याच काळात ते निर्गुंतवणूक मंत्रीही होते. राजकीय नेते आणि निष्णात वकील असलेल्या अरुण जेटलींनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये वरिष्ठ वकील म्हणून काम केलं. अरुण जेटलींना चार्टर्ड अकांउंटंट व्हायचं होतं पण ते स्वप्न ते पूर्ण करू शकले नाहीत. दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यकर्ता म्हणून काम केलं. जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला.1977 मध्ये अरुण जेटलींची दिल्ली अभाविपच्या अध्यक्षपदी निवड झाली. ते भाजपच्या युवागटाचे अध्यक्षही होते. बोफोर्स घोटाळ्याची चौकशी माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये अरुण जेटलींनी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिलं. त्यावेळी त्यांनी बोफोर्स घोटाळ्याच्या चौकशीची कागपदत्रं तयार केली होती. अरुण जेटलींनी लालकृष्ण अडवाणी, माधवराव सिंदिया, शरद यादव या नेत्यांसाठी वकील म्हणून काम केलं आहे. कायदा आणि राजकीय घडामोडींवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखनही केलं आहे. त्यांनी कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही वकील म्हणून काम पाहिलं. कोका कोला आणि पेप्सीच्या खटल्यात त्यांनी पेप्सी कंपनीची बाजू लढवली होती. 2009 मध्ये राज्यसभेत विरोधी पक्षनेते झाल्यानंतर अरुण जेटलींनी वकिली सोडली आणि राजकीय क्षेत्रात स्वत:ला झोकून दिलं. अरुण जेटली अनेक वर्षं दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही होते. VIDEO: मुख्यमंत्र्यांचा खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार; प्रश्नाला दिलं ‘हे’ उत्तर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







