नवी दिल्ली, 24 जुलै : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्लीत हृदयविकाराचा झटका आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले असताना ही घटना घडली. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने हर्षवर्धन जाधव यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेत असतानाचे त्यांचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. यामध्ये हर्षवर्धन जाधव स्वत:च प्रकृतीबद्दल सांगताना दिसत आहेत. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी असतानाच हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. जाधव यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समजते. हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.
देशाची काळजी घ्या, चांगलं वागा, वाचलो तर भेटू; हर्षवर्धन जाधव यांचा Video आला समोर#Politics #Maharashtra pic.twitter.com/QwhZruzwzQ
— News18Lokmat (@News18lokmat) July 24, 2023
हर्षवर्धन यांचे व्हिडीओ समोर आले असून त्यात ते सांगताना दिसतात की, मला बहुतेक अटॅक आला आहे. माझी एन्जिओ प्लास्टी झाली आहे. माझं डोकं दुखतंय, छातीत कळ येतेय, खूप घाम येतोय. मला सरकारच्या गाडीने घेऊन चालले आहेत. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या, कन्नड विधानसभा मतदारसंघाची काळजी घ्या, चांगलं वागा, चांगल्या लोकांशी बोला, परोपकारी भावनेने जगा. वाचलो तर पुन्हा भेटू असंही त्यांनी म्हटलं. …अन् जयंत पाटलांनी सुनील तटकरेंना मारली मिठी, PHOTOS मुळे चर्चांना उधाण हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी मार्च महिन्यात भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केलाय. लोकसभेला त्यांनी लाखो मते मिळवली होती. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरेंना पराभवाचा धक्का बसला होता. एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिल्यांदा १३ आमदार निवडून आले होते. त्यात एक हर्षवर्धन जाधव हे होते. औरंगाबादच्या कन्नड मतदारसंघातून ते विजयी झाले होते. मात्र त्यानंतर मनसेला रामराम करत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकिटावरही त्यांनी निवडणूक जिंकली. पण शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर स्वत:च्या पक्षाची स्थापना केली होती.