बुलेट बाइकने फटाके फोडणं एका युवकाला चांगलंच महागात पडलं आहे. हा युवक मुलींच्या महाविद्यालयासमोर बुलेटचे फटाके फोडत होता. हा प्रकार पाठीमागून येणाऱ्या पोलिसांना पाहिला, आणि संबंधित तरुणाला चांगलीच अद्दल घडवली आहे. त्याला त्वरित पकडून पोलीस ठाण्यात नेलं आहे.
यावेळी पोलिसांनी युवकाकडे बाइकच्या कागदपत्रांची मागणी केली असता, तरुणाकडे कागदपत्रं नव्हती. शिवाय नंबर प्लेटवर नंबरच्या ऐवजी नम्बरदार असं लिहिलं होतं. त्यामुळे पोलिसांनी संबंधित बुलेटही जप्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोहाना येथील काही बुलेट चालकांविरुद्ध कारवाईचं सत्र सुरू होतं. गोहानामध्ये आतापर्यंत तिन दिवसांत 7 ते 8 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 2,34,000 रुपयांचा दंड आकारला आहे.
या प्रकरणी माहिती देताना गोहाना सिटी पोलीस स्टेशनचे प्रभारी सवित कुमार यांनी सांगितलं की, संबंधित तरुण मुलींच्या महाविद्यालयासमोर बुलेट बाईकचे फटाके वाजवत होता, ज्याला आम्ही पकडलं आहे. पोलिसांच्या चौकशीत संबंधित तरुणाकडे कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वराला 56,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
अशा बुलेटच्या आवाजामुळे रस्त्यावरील जाणारी येणारी लोकं पूर्णपणे घाबरतात. ज्यामुळे त्यांच्या अपघाताचा धोका संभवतो.