नवी दिल्ली, 09 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान (Kisan Tractor Rally) लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकवणाऱ्या दीप सिद्धूला (Deep Sidhu) अखेर दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूवर 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. अखेर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 14 दिवसानंतर त्याला अटक केली आहे. स्पेशल सेलचे डीसीपी संजीव यादव यांनी दीप सिद्धुला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची विराट ट्रॅक्टर रॅली दिल्ली काढण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोड बंदोबस्त लावून सुद्धा शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन लालकिल्ल्यावर धडकले होते. लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर संतप्त झालेला जमाव हा लाल किल्ल्यात घुसला होता. यावेळी जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. तसंच लाल किल्ल्यात घुसून आंदोलकांनी किल्ल्याच्या घुमटावर झेंडा फडकावला होता. यावेळी दीप सिद्धू हा तिथेच होता. दीप सिद्धू हा भाजपचाच कार्यकर्ता असल्याचा आरोप झाला होता. घटनेनंतर तो फरार झाला होता. ’ लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारामुळे शेतकरी आंदोलनावर याचा परिणाम झाला. तर दुसरकडे दीप सिद्धू याचे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच फोटो व्हायरल झाले होते. तसंच भाजपचे पंजाबमधील खासदार सनी देओल यांच्याशी सिद्धूचे घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दीप सिद्धू शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसून बंडाची, चिथावणीची भाषा करीत होता, लाल किल्ल्यावर घुसून ज्या झुंडीने हडकंप माजवला, त्या झुंडीचे नेतृत्व दीप सिद्धू करीत होता’, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते राजेश टिकैत यांनी केला होता.