मेघा उपाध्याय, प्रतिनिधी इंदूर, 13 जुलै : देशात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ असल्याचे चित्र आहे. सातत्याने रस्ते अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लहानशा चुकीमुळे एका महिला प्राध्यापकाच्या मृत्यूने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्ते अपघातात एका महिला प्राध्यापकाचा मृत्यू झाला आहे. सुप्रिया असे या महिला प्राध्यापिकेचे नाव आहे. इंदूरमध्ये ही घटना घडली. सेज विद्यापीठाच्या दोन महिला प्राध्यापिका स्कूटीने महाविद्यालयात जात होती. त्याचवेळी समोर आलेल्या श्वानाला वाचवण्यात त्यांचा तोल गेला आणि स्कूटीसह त्या खाली पडल्या. यामुळे प्राध्यापिका सुप्रिया त्रिपाठी या गंभीर जखमी झाल्या आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेल्या आणखी एक महिला प्राध्यापिका प्रियंका राजपूत या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
सुप्रिया त्रिपाठी या रीवा येथील रहिवासी होत्या. मात्र, गेल्या 6 वर्षांपासून त्या आपल्या पतीसह इंदूरच्या कनाडिया परिसरात असलेल्या करुणा सागर अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या राहत होत्या. त्यांचे पती व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच संपूर्ण परिवाराला मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं - सेज विद्यापीठ महाविद्यालयाच्या स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी सकाळच्या सुमारास प्रियकां राजूपत आणि सुप्रिया त्रिपाठी महाविद्यालयात जाण्यासाठी स्कूटीने येत होत्या. स्कूटी प्रियका या चालवत होत्या तसेच त्यांनी हेलमेटही घातला होता. तर सुप्रिया या मागे बसल्या होत्या. तसेच त्यांनी हेलमेट घातला नव्हता. दरम्यान, तेजाजी नगर बायपास वरुन महाविद्यालयात येत असताना त्यांच्या स्कूटीसमोर एक श्वान आला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कूटी स्लिप झाली आणि दोन्ही प्राध्यापिका खाली पडल्या. या अपघातात प्रियंका राजपूत यांनी हेलमेट घातल्याने त्यांना जास्त मार लागला नाही. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, सुप्रिया या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना एका जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या तब्येत आणखी खालावत गेल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण, प्रकृतीमध्ये सुधारणा न होत असल्याने त्यांना एम. वाय. रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, याठिकाणी आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. तसेच शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह हा त्यांच्या परिवाराला देण्यात आला आहे.