नवी दिल्ली 29 जानेवारी : कृषी कायद्यांविरोधात (New Farm Laws) आंदोलन करत शेतकऱ्यांचा आवाज बनलेल्या राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा बदलली आहे. दिल्ली हिंसेसाठी जबाबदार मानले जात असलेल्या राकैश टिकैत यांना गुरूवारी माध्यमांसोमरच अश्रु अनावर झाले. ज्यानंतर समाप्त होताना दिसत असलेलं आंदोलन पुन्हा एकदा मजबूत होताना पाहायला मिळालं. त्यांच्या या व्हिडिओनंतर लोकांनी गाझीपुर बॉर्डरकडे (Ghazipur Border) धाव घेतली. विशेष बाब म्हणजे, शेतकरी राजकारणाशी टिकैत यांचं जुनं नातं आहे. सध्या तुरुंगवास होण्याची शक्यता असलेले टिकैत एकेकाळी दिल्ली पोलिसात हवालदार होते. हिंसाप्रकरणी पोलिसांनी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता टिकैत यांच्या गाझीपुरमधील तंबूच्या बाहेर नोटीस लावली असून त्यांना 3 दिवसांचा वेळ दिला आहे. मात्र, आपण आंदोलन सोडून कुठेही जाणार नसल्याचं टिकैत यांनी स्पष्ट केलं आहे. कोण आहेत राकेश टिकैत - राकेश टिकैत यांचे वडिल 1987 मध्ये स्थापन झालेल्या किसान युनियनचे (Bhartiya Kisan Union) अध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूनंतर या गादीवर राकेश टिकैत यांचे मोठे भाऊ नरेश टिकैत बसले. यानंतरच राकेश टिकैत यांच्यावर प्रवक्ता ही जबाबदारी सोपवली गेली. 4जून 1969 मध्ये जन्मलेल्या राकेश यांनी एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शेतकरी आंदोलनांमुळे त्यांना 44 वेळा अटकही करण्यात आली आहे.
(वाचा - Farmers Protest : सिंघू बॉर्डरवर स्थानिक-शेतकऱ्यांमध्ये दगडफेक, अश्रूधुराचा वापर )
राजकारणाचा रस्ता - राकेश टिकैत 1985 मध्ये दिल्ली पोलिसात हवालदार म्हणून भरती झाले होते. प्रमोशननंतर त्यांनी उपनिरीक्षकाची जबाबदारीही सांभाळली. 90 च्या दशकातील वेळ होती आणि लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन राकेश यांचे वडिल महेंद्रसिंग टिकैत यांच्या नेतृत्वात सुरू होतं. असं म्हटलं जातं, की यावेळी सरकारकडून राकेश यांच्यावर त्यांच्या वडिलांचं आंदोलन संपवण्यासाठी दबाव टाकला जात होता. याच कारणामुळे त्यांनी राजीनामा देत शेतकऱ्यांसोबत चालण्याचा निश्चय केला.
(वाचा - Farmers Protest : दिल्लीत हिंसा करणारे 6 जण, दिल्ली पोलिसांकडे 200 VIDEO )
आजही राकेश टिकैत घेतात निर्णय - वडिलांच्या मृत्यूनंतर नरेश यांना अध्यक्षाची जबाबदारी मिळाली असली, तरी मोठे निर्णय राकेश यांच्या म्हणण्यानुसारच घेतले जातात. शेतकरी आंदोलनातही राकैश यांचंच म्हणणं ऐकलं गेलं. याआधी 2 वेळी राकेश टिकैत यांनी राजकारणात येण्याचा प्रयत्नही केला आहे. पहिल्यांदा 2007 मध्ये खतौली विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, तर दुसऱ्यांदा 2014 मध्ये अमरोहा येथून राष्ट्रीय लोक दल पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवली. मात्र, दोन्ही वेळा त्यांना अपयश आलं.