दिल्ली ,15 फेब्रुवारी : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) गेल्या 80 दिवसांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलनं (Farmers protest) सुरू आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. याबाबत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत सरकारने अनेक वेळा चर्चा केली; मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. तरी आता आंदोलनाची धार कमी होत असल्याचं चित्र (Protest at delhi border) आहे.
शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या गाझीपूर सीमेवर (Gazipur Border) आज काहीसं वेगळेच चित्र पाहायला मिळालं. आज सकाळपासूनच गाझीपूर सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य असल्याचं दिसून आलं. शेतकऱ्यांअभावी येथील रस्ते ओस पडले होते. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी याच गाझीपूर सीमेवरून अधिकाधिक संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावं, अशी विनंती केली होती.
किसान आंदोलनात फूट पडल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. शेतकरी संघटनांशी संबंधित नेते शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याची भाषा करीत असले, तरी आतलं वास्तव काही निराळंच आहे. गाझीपूर सीमेवरची आजची स्थिती बघता हे आंदोलन काहीसं कमजोर झालं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
टूल किटचं महाराष्ट्र कनेक्शन : ट्वीटच्या तपासात बीडपर्यंत पोहोचले पोलीस
गाझीपूर सीमेवर आज सकाळी शेतकऱ्यांची संख्या अगदीच नगण्य होती. या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांपर्यंत आपले म्हणणं मांडण्यासाठी बांधण्यात आलेला किसान मंच पूर्णपणे रिकामा होता. मंचाबरोबरच रस्त्यांवरदेखील फारसे शेतकरी नव्हते. किसान आंदोलनाच्या नावाखाली रस्ते बंद होते. तंबू आणि लंगर सेवेनजीक केवळ एखाद-दुसरी व्यक्ती दिसून येत होती.
18 फेब्रुवारीला रेल रोको अभियानाचे आयोजन
किसान ट्रॅक्टर रॅली आणि देशभरात चक्का जाम आंदोलन केल्यानंतर आता संयुक्त मोर्चानं आता 18 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 4 या वेळेत रेल रोको अभियानाचं आयोजन केलं आहे. या निर्णयामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण होऊ शकतो. संयुक्त मोर्चाने 16 फेब्रुवारीला शेतकरी नेते सर छोटू राम यांच्या जयंतीचं औचित्य साधून देशभरात शेतकऱ्यांची एकजूट असल्याचं दर्शन घडवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.