नवी दिल्ली, 28 जानेवारी : दिल्लीत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी, कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. सकाळी आंदोलक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला होता. यावेळी दिल्लीच्या रस्त्यांवर मोठा हिंसाचार झाला. मंगळवारी झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. हिंसाचाराप्रकरणी FIR दाखल करण्यात आल्या आहेत. FIR मध्ये सरकारी संपत्तीचं नुकसान, बंडखोरी, शस्त्रांत्रांचा समावेश, मारहाण असे कलम सामिल आहेत. या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ लाल किल्ल्याच्या आतील आहे. आंदोलक लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या सीआयएसएफ बसला निशाणा करून बसची तोडफोड करत आहे. आंदोलकांकडून बसच्या काचा फोडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसंच बसच्या आजूबाजूला अनेक आंदोलक दिसत असून अनेकांच्या हातात काठ्या असल्याचंही दिसतंय. व्हिडीओमध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 62 दिवसांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी 26 जानेवारीला काढलेल्या रॅलीला हिंसक स्वरूप प्राप्त झालं. दिल्ली पोलिसांनी कडेकोड बंदोबस्त ठेवूनही शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन लालकिल्ल्यावर धडकले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडकवण्यासाठी लाल किल्ल्याजवळ बॅरिकेट लावले होते. मात्र, दिल्लीच्या सीमेपासून लाल किल्ल्यापर्यंत पोहोचलेल्या आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेटही तोडले आणि लाल किल्ल्याकडे कूच केली.
(वाचा - दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनात नंदुरबारच्या महिला शेतकऱ्याचा मृत्यू )
लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दिल्लीच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्याने, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रूधुराचा वापर करावा लागला होता.

)







