मुंबई, 24 जानेवारी: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाने (JNU) आपल्या स्टुडंट युनियनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या बीबीसीच्या "इंडिया: द मोदी क्वेश्चन" डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग रद्द करण्यास सांगितलं आहे. विद्यापीठाच्या स्टुडंट युनियनने (JNUSU) मंगळवारी (24 जानेवारी 23) त्यांच्या ऑफिसमध्ये वादग्रस्त डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगची घोषणा करणार असल्याचं पोस्टर प्रसिद्ध केलं आहे. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने हा निर्णय घेतला. दुसरीकडे, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या गटाने 21 जानेवारी रोजी विद्यापीठात बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग आयोजित केले होते. त्यानंतर जेएनयूतील विद्यार्थी संघटनेने ही डॉक्युमेंट्री जेएनयू विद्यापीठ परिसरातील त्यांच्या ऑफिसात दाखवण्याचं जाहीर केलं आहे.
डॉक्युमेंट्रीचा कार्यक्रम रद्द न केल्यास विद्यापीठाच्या नियमांनुसार शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचा इशाराही जेएनयू प्रशासनाने विद्यार्थ्यांना दिला आहे. दरम्यान, जवाहरलाल नेहरू स्टुडंट्स युनियनच्या सूत्रांनी सांगितलं की, डॉक्युमेंट्रीवर कायदेशीर बंदी घातली नसल्यामुळे ते स्क्रीनिंग करतील. हैदराबादमधील स्क्रीनिंग स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन आणि मुस्लिम स्टुडंट फेडरेशन म्हणजेच फ्रॅटर्निटी ग्रुपने आयोजित केलं होतं. गटातील 50 हून अधिक विद्यार्थी स्क्रीनिंगला उपस्थित होते.
सरकारने शुक्रवारी ट्विटर आणि यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना "इंडिया: द मोदी क्वेश्चन" या डॉक्युमेंट्रीच्या लिंक ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. परराष्ट्र मंत्रालयाने या डॉक्युमेंट्रीला ‘प्रोपगंडा पिस’ म्हटलंय. तसंच यात कोणतीही सत्यता नाही आणि यातून ब्रिटिश वसाहतवादी मानसिकतेचं दर्शन घडत आहे, असं म्हटलंय. तर, डॉक्युमेंट्रीच्या लिंक ब्लॉक केल्याने विरोधकांनी केंद्र सरकावर टीका केली आहे.
जेएनयू प्रशासनाने सोमवारी एका अॅडव्हायजरीत म्हटलंय की, विद्यार्थी युनियनने या कार्यक्रमासाठी परवानगी घेतलेली नाही, त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करावा. यामुळे तिथली शांतता भंग होण्याचा धोका आहे. या संदर्भात जेएनयू स्टुडंट्स युनियनच्या अध्यक्षा आयशी घोष यांना कॉल आणि मेसेज केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
हेही वाचा: परीक्षेला हिजाब घालून बसण्याची परवानगी द्या, विद्यार्थीनींची सर्वोच्च न्यायालयात धाव
दरम्यान, ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ ही डॉक्युमेंट्री स्टुडंट युनियनच्या कार्यालयात रात्री 9 वाजता प्रदर्शित केली जाईल, असं लावलेल्या पोस्टरमध्ये म्हटलंय.
दुसरीकडे, “जेएनयूएसयूच्या नावाने विद्यार्थ्यांच्या एका गटाने “इंडिया: द मोदी क्वेश्चन” या डॉक्युमेंट्रीच्या प्रदर्शनासाठी एक पॅम्प्लेट प्रसिद्ध केल्याचं विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आलंय. 24 जानेवारी 2023 रोजी रात्री 9 वाजता टेफ्लास इथं होणाऱ्या या कार्यक्रमासाठी JNU प्रशासनाकडून कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नाही," असं विद्यापीठाच्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटलंय.
“अशा कार्यक्रमांमुळे विद्यापीठ कॅम्पसमधील शांतता आणि सौहार्द बिघडू शकतं. त्यामुळे संबंधितांना हा प्रस्तावित कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे न झाल्यास विद्यापीठाच्या नियमांनुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते,” असंही त्यात म्हटलंय.
"इंडिया: द मोदी क्वश्चन" या दोन भागांच्या बीबीसी डॉक्युमेंट्रीची सध्या चांगलीच चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीशी संबंधित काही पैलूंवर संशोधन करण्याचा या डॉक्युमेंट्रीत प्रयत्न केला आहे, असा दावा यात करण्यात आलाय. ही डॉक्युमेंट्री भारतात प्रदर्शित झालेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: JNU, Narendra Modi