विक्रम कुमार झा, प्रतिनिधी पुर्णिया, 5 जुलै : आजकाल बहुतांशी तरुणमंडळींची प्रेमविवाहाला पसंती असली तरी अनेक भागांमध्ये आजही कुटुंबियांचा प्रेमाला विरोध असतो. अशावेळी कोणाचा आणि कसलाही विचार न करता प्रियकर-प्रेयसी पळून जाऊन संसार थाटण्याचं धाडस करतात. त्यामुळे त्यांच्या कटुंबीयांना समाजाकडून मिळणाऱ्या गैरवर्तणुकीचा सामना करावा लागतो. बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. प्रियकरासोबत पळून गेलेल्या तरुणीची तिच्या कुटुंबीयांनी थेट अंत्ययात्राच काढली. पुर्णियाच्या बनमनखी भागातील बहोरा गावात ही घटना घडली. प्रियंका कुमारीच्या वडिलांनी आणि भावाने जिवंतपणी तिच्या फोटोची अंत्ययात्रा काढली आणि घराजवळच्या शेतात तिच्यावर अंत्यसंस्कार केले. तिथीनुसार तिचं श्राद्धही घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तिचा भाऊ म्हणाला, ‘बहिणीने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्यामुळे आम्हालाही आता असं करताना काही वाटत नाहीये. आता ती आमच्यासाठी मेलीये.’ दरम्यान, या तरुणीचं लग्न एका महिन्यावर असताना तिने हे टोकाचं पाऊल उचललं.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी दुपारी जवळपास 12 वाजताच्या सुमारास प्रियंका कुमारी कॉलेजमधून निकाल आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. संध्याकाळपर्यंत ती घरी न आल्याने घरच्यांनी तिला शोधायला सुरुवात केली. सगळीकडे पाहिल्यानंतर कळलं की, चंपानगर बाजारात राहणाऱ्या मनोज कामती यांचा मुलगा नीरज कुमार याच्यासह ती पळून गेली. त्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी दोघांचा तपास सुरू केला. Political Crisis : …म्हणून शरद पवार यांच्याविरोधात हे षडयंत्र रचलं जातंय; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा गौप्यस्फोट मुलगी घरी येतच नाही, हे पाहून प्रियंका कुमारीच्या कुटुंबीयांनी मंगळवारी घराशेजारील शेतावर तिची विधिवत अंत्ययात्रा काढली. यावेळी तिचे वडील किशोर सिंह आणि काका अमोद कुमार सिंह म्हणाले, ‘आम्ही मुलीला अत्यंत लाडात वाढवलं. तिला कशाचीही कमी पडू दिली नाही. पुढच्या शिक्षणासाठीही संपूर्ण कुटुंबाने पाठिंबा दिला. परंतु तिने मात्र आम्हा सर्वांना समाजात अपमानित करून सोडलं. आता हिच्या अंत्ययात्रेमुळे निदान इतर मुलीतरी असं पाऊल उचलण्यापूर्वी एकदा कुटुंबीयांचा विचार करतील.’ दरम्यान, प्रियंका कुमारीचं ज्या तरुणाशी लग्न ठरलं होतं, त्याची संसाराची सगळी स्वप्न धुळीत मिसळली आहेत.

)







