Home /News /national /

Election 2020 LIVE : माजी मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त कमेंटमुळे देशभरात चर्चेचा विषय झालेल्या इमरती देवी अखेर हरल्या

Election 2020 LIVE : माजी मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त कमेंटमुळे देशभरात चर्चेचा विषय झालेल्या इमरती देवी अखेर हरल्या

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal nath) यांनी तिथल्या भाजप उमेदवार इमरती देवी (Imarti Devi) यांच्याबद्दल केलेली टिप्पणी नंतर खूपच वादाचा विषय झाली आणि कमलनाथ यांच्या अंगाशी आली.

    भोपाळ, 10 नोव्हेंबर : प्रचारादरम्यान सर्वाधिक चर्चा आणि वाद झाले त्या भाजप उमेदवार इमरती देवी अखेर पराभूत झाल्या.  थेट काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री इमरती देवींवर (Imarti Devi)केलेल्या एका कमेंटमुळे वादाचा विषय झाले आणि निवडणूक आयोगाच्या कारवाईलाही सामोरे गेले होते. बिहार विधानसभेबरोबरच (Bihar Election Result 2020) मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकांच्या (Madhya Pradesh Bypolls) निकालाविषयी देशभर उत्सुकता होती. इमरती देवी हरल्या असल्या तरी भाजपने 28 पैकी 19 जागांवर विजय मिळवला आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या 28 जासांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. मध्य प्रदेशातल्या डबरा मतदारसंघाच्या निकालाविषयी उत्सुकता असण्याचं कारण म्हणजे कमलनाथ (Kamal nath) यांनी तिथल्या भाजप उमेदवार इमरती देवी यांच्याबद्दल केलेली टिप्पणी नंतर खूपच वादाचा विषय झाली आणि कमलनाथ यांच्या अंगाशी आली. कमलनात यांनी केलेल्या विवादास्पद कमेंटमुळे इमरती देवी संतापल्या होत्या आणि कमलनाथ यांच्या त्या वक्तव्याचा देशभरातून निषेध झाला होता. डबरा मतदारसंघात इमरती देवी या उमेदवार महिलेला उद्देशून कमलनाथ यांनी अपमानास्पद भाषा वापरली. त्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. 48 तासांत कमलनाथ यांनी याचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा होती. पण कमलनाथ यांनी माफी मागितली नाही. आता याच इमरती देवी यांना प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांनी पराभव केला. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडीवर असणाऱ्या इमरती देवींना अखेर हार पत्करावी लागली. राहुल गांधी यांनीसुद्धा "कमलनाथ आमच्या पक्षाचे असले तरी त्यांनी वापरलेली भाषा मला अजिबात पसंत नाही", अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरही कमलनाथ यांनी माफी न मागता, राहुल गांधी यांचे वैयक्तिक विचार असल्याचं सांगितलं. निवडणूक आयोगाने आणखी कठोर कारवाई करत कमलनाथ यांचा स्टार प्रचारक असल्याचा दर्जा काढून घेतला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीतल्या नेत्यांचा प्रचारखर्च, त्यांचा प्रवास, राहणं, विमानाचा प्रवास हे पक्षाच्या खात्यात धरता येतं.  कमलनाथ यांना घेऊन कुठल्या मतदारसंघात प्रचार करण्यात आला तर तो खर्च पक्षाच्या नव्हे तर उमेदवाराच्या वैयक्तिक खात्यातून केल्याचं धरलं जाईल, अशी तरतूद आहे. यामुळे उमेदवारावरचा दबाव वाढला. उमेदवाराला प्रचारावर किती खर्च करायचा यावरसुद्धा आदर्श आचारसंहितेत मर्यादा असल्यामुळे मध्य प्रदेशात कमलनाथ यांची चांगलीच अडचण झाली. पण त्याविरोधात कमलनाथ आणि काँग्रेस कोर्टात गेले आणि कोर्टाने निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती दिली होती. कमलनाथ यांनी प्रचारादरम्यान भाजपच्या इमरती देवी यांच्याबद्दल वापरलेल्या आयटेम या शब्दावरून गदारोळ उठला होता. राहुल गांधी यांनीही या प्रकरणी कमलनाथ यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Kamal nath, Madhya pradesh

    पुढील बातम्या