Home /News /national /

'मांस, मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खा'; भाजप मंत्र्यांच्या सल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात वादळ

'मांस, मच्छी, मटणापेक्षा बीफ जास्त खा'; भाजप मंत्र्यांच्या सल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात वादळ

आतापर्यंत गोमांस (Beef) बाळगल्याच्या नुसत्या संशयावरूनही अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत. त्यात चक्क भाजप मंत्र्यांना नागरिकांना बीफ खाण्याचा सल्ला दिला आहे.

    मेघालय, 31 जुलै : बीफ अर्थात गोमांस हा भारतात अत्यंत संवेदनशील विषय आहे. हा नागरिकांच्या श्रद्धेचा विषय आहे. तसंच या विषयावरून देशात अनेक प्रकारचं राजकारण, हिंसा, वादविवाद आदी गोष्टीही घडलेल्या आहेत. गोमांस (Beef) बाळगल्याच्या नुसत्या संशयावरूनही अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत. भारतीय जनता पक्षाची भूमिका बीफ खाण्याविरुद्ध आहे; मात्र मेघालयसारख्या ईशान्येकडच्या राज्यांत (Northeast States) मात्र गोमांसाचा मुद्दा भाजपला या भूमिकेवरून कायमच अडचणीत आणणारा ठरतो. भाजपचे मेघालयमधले ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री म्हणून नुकतीच शपथ घेतलेले सनबोर शुलई यांनी अशीच एक भूमिका नुकतीच मांडली आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने 'लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मेघालयचे पशुपालन आणि पशुचिकित्सा मंत्री शुलई यांनी शुक्रवारी (30 जुलै) पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी या विषयावर भाष्य केलं. भारत हा लोकशाही देश आहे. त्यामुळे देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वतःला जे आवडेल ते खाण्याचं स्वातंत्र्य आहे. चिकन, मटण, मांस आदींच्या तुलनेत आपण लोकांना बीफ अधिक प्रमाणात खाण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत, असं सनबोर शुलई यांनी सांगितलं. भाजप गोहत्येवर निर्बंध आणेल, अशी लोकांची धारणा असून, लोकांना बीफ खाण्यासाठी प्रोत्साहित केल्यानंतर ती दूर होईल, असं शुलई यांनी सांगितलं. शुलई यांच्या या वक्तव्याला पार्श्वभूमी आहे ती आसाममध्ये (Assam) आलेल्या एका कायद्याची. आसामने नुकताच गो संरक्षण कायदा आणला असून, त्यानुसार शेजारच्या बांगलादेशमध्ये होणारी गायींची तस्करी रोखण्यासाठी आसाममधून गायींच्या आंतरराष्ट्रीय निर्यातीवर निर्बंध येणार आहेत. या कायद्याचा परिणाम कोणत्याही प्रकारे मेघालयवर होऊ नये, यासाठी आपण आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्याशी संवाद साधणार आहोत, असंही शुलई यांनी स्पष्ट केलं आहे. हे ही वाचा-राहुल गांधी बँकॉकला जाऊन काय करतात विचारा?, BJP चा काँग्रेसला सवाल मेघालय (Meghalaya) आणि आसामच्या सीमावादाबद्दल भाष्य करताना शुलई म्हणाले, की आम्ही हिंसेचं समर्थन करत नाही; मात्र आसामच्या लोकांकडून सीमेवरच्या आमच्या नागरिकांना त्रास दिला जात असेल, तर आता गप्प बसण्याची वेळ नाही. आम्हाला उत्तर द्यावं लागेल. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरील पक्ष आहे आणि बीफ (Beef) अर्थात गोमांस या विषयावरची या पक्षाची देशपातळीवरची भूमिका गोमांसाविरुद्धची आहे; मात्र ईशान्येकडच्या राज्यांमध्ये गोमांस खाणं ही संस्कृती मानली जाते. त्यामुळे तिथे भाजपची ही भूमिका विसंगत ठरते. मेघालयची राजधानी शिलाँग येथे बडा बाजार भागात असलेल्या बीफच्या मार्केटमध्ये लोकांची कायमच प्रचंड गर्दी असते. मेघालयमधले सुमारे 90 टक्के नागरिक बीफ खातात. पक्षाची भूमिका गोमांसाविरुद्ध असल्यामुळे भाजपच्या काही नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी त्या वेळी राजीनामेही दिले होते. कारण लोकभावनेच्या विरुद्ध भूमिका घेता येणार नसल्याचं कारण त्यांनी त्या वेळी दिलं होतं. त्यामुळेच तिथल्या निवडणुकीवेळी भाजपने या राज्यांत गोमांसबंदी करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आता परत एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे.
    First published:

    Tags: BJP, Meghalaya

    पुढील बातम्या