जाहिरात
मराठी बातम्या / देश / डॅाक्टरांवर विश्वास ठेवायचा तरी कसा? 5 वर्षांनंतर महिलेच्या पोटात सापडला चिमटा

डॅाक्टरांवर विश्वास ठेवायचा तरी कसा? 5 वर्षांनंतर महिलेच्या पोटात सापडला चिमटा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हर्षिना यांच्यावर एकूण तीन सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या.

  • -MIN READ Local18 Kerala
  • Last Updated :

    तिरुवनंतपुरम, 24 जुलै : एका महिलेवर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांकडून एक चिमटा (फोरसेप) तिच्या पोटात राहून गेला होता. हर्षिना नावाच्या 32 वर्षांच्या महिलेने पाच वर्षांचा त्रास सोसल्यानंतर तिच्या तक्रारीत तथ्य असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. केरळमधल्या कोळिकोडे इथे राहणाऱ्या महिलेवर 2017मध्ये सीझेरियन सेक्शन शस्त्रक्रिया झाली होती. कोळिकोडे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेवेळी एक फोरसेप तिच्या पोटात राहिला होता; मात्र ते संबंधितांकडून मान्य केलं जात नव्हतं. मेडिकल कॉलेज असिस्टंट कमिशनर के. सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तपास पथकाने केलेल्या तपासाच्या अहवालात संबंधित महिलेचा दावा सत्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. दोन डॉक्टर्सनी केलेल्या या शस्त्रक्रियेवेळी दोन नर्सेसही उपस्थित होत्या. त्यांनी संबंधित महिलेवर शस्त्रक्रिया केल्यानंतर फोरसेप तिच्या पोटातच राहून गेला होता. मेडिकल कॉलेज पोलिसांनी संबंधितांविरोधात वैद्यकीय दुर्लक्ष कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    हर्षिना या महिलेची ती तिसरी डिलिव्हरी होती. त्या वेळी कोळिकोडे इथल्या मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये झालेल्या सिझेरियन शस्त्रक्रियेवेळी गंभीर चूक घडल्याचं मेडिकल कॉलेजकडून अखेर मान्य करण्यात आलं. विशेष पोलीस तपास पथकाने आपला अहवाल सादर केल्यानंतर आज (24 जुलै) हर्षिना या पीडित महिलेने समाधान व्यक्त केलं. ‘सत्य अखेर समोर आलं हे पाहून मला आनंद झाला. 2017मध्ये मी कोळिकोडे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या या चुकीकडे लक्ष वेधलं होतं, त्या वेळी ती तक्रार फेटाळण्यात आली. मंत्र्यांनीही असं सांगितलं होतं, की याबद्दल कोणताही पुरावा नाही. आता माझी बाजू बळकट झाली आहे. न्याय मिळेपर्यंत मी लढा देणार आहे,’ असं हर्षिना यांनी सांगितलं. दरम्यान, याआधी वैद्यकीय तज्ज्ञांनीही या प्रकरणी एक चौकशी केली होती; मात्र त्यात डॉक्टरांकडून काही चूक झाल्याची शक्यता फेटाळून लावण्यात आली होती. हर्षिना यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलीस तपास सुरू करण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आपला अहवाल सादर केला. वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्याची मागणी त्यांनी त्यात केली. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालच्या या मंडळात तपास अधिकारी, सरकारी वकील, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, तसंच मेडिसीन, सर्जरी आणि फॉरेन्सिक मेडिसीन या शाखांचे डॉक्टर्स असतील. त्यांची बैठक एक ऑगस्ट रोजी होणार आहे. हर्षिना यांच्यावर एकूण तीन सिझेरियन शस्त्रक्रिया झाल्या. त्यापैकी पहिल्या दोन शस्त्रक्रिया थमरासेरी तालुका हॉस्पिटलमध्ये झाल्या होत्या. तिसरी शस्त्रक्रिया 30 नोव्हेंबर 2017 रोजी कोळिकोडे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. अनेक समस्या उद्भवल्या. 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी शहर पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. सिझेरियन शस्त्रक्रियेवेळी फोरसेप पोटातच राहून गेल्याचा दावा तिने त्या तक्रारीत केला होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात