मराठी बातम्या /बातम्या /देश /

दोन मुलं आणि पतीचं निधन, धीर न सोडता घरातच सुरु केली शाळा; द्रोपदी मुर्मू यांचा खडतर प्रेरणादायी प्रवास

दोन मुलं आणि पतीचं निधन, धीर न सोडता घरातच सुरु केली शाळा; द्रोपदी मुर्मू यांचा खडतर प्रेरणादायी प्रवास

द्रोपदी मुर्मू यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मुर्मू यांनी पती आणि दोन मुलांना गमावल्यानंतर आयुष्यात संघर्ष केला आणि समाजाला शिक्षित करण्याचा ध्यास घेतला.

द्रोपदी मुर्मू यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मुर्मू यांनी पती आणि दोन मुलांना गमावल्यानंतर आयुष्यात संघर्ष केला आणि समाजाला शिक्षित करण्याचा ध्यास घेतला.

द्रोपदी मुर्मू यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मुर्मू यांनी पती आणि दोन मुलांना गमावल्यानंतर आयुष्यात संघर्ष केला आणि समाजाला शिक्षित करण्याचा ध्यास घेतला.

नवी दिल्ली 25 जुलै: द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज स्वतंत्र भारताच्या (President of India) 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यामधील एका छोट्या गावात जन्मलेल्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचतील याचा कोणीही विचार केला नसेल. मुर्मू यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मुर्मू यांनी पती आणि दोन मुलांना गमावल्यानंतर आयुष्यात संघर्ष केला आणि समाजाला शिक्षित करण्याचा ध्यास घेतला. शिक्षिकेपासून त्या देशातल्या सर्वोच्च संवैधानिक पदापर्यंत पोहोचल्या आहेत. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या आणि सर्वांत तरुण राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. आज 25 जुलै रोजी त्यांचे वय 64 वर्षे 1 महिना आणि 8 दिवस आहे. यापूर्वी हा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता. ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचं वय 64 वर्षे दोन महिने 6 दिवस होते. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांच्यानंतर देशातील दुसऱ्या महिला आहेत.

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरंची नारायण टुडू आहे. त्या आदिवासी संथाल कुटुंबातील आहे. त्यांनी कुसुमी तहसीलमधील उपरबेडा या गावात असलेल्या एका छोट्याशा शाळेतून शिक्षण घेतलं आणि नंतर भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.

द्रौपदी मुर्मूंचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला होता. या जोडप्याला दोन मुलं आणि एक मुलगी झाली, परंतु लग्नानंतर काही काळातच त्यांचे पती आणि त्यांच्या दोन्ही मुलांचं निधन झालं. पती आणि मुलांच्या मृत्यूने न खचता द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या आदिवासी समाजाला शिक्षित करण्याचा वसा घेतला. आपल्या या ध्येयासाठी त्यांनी राहत्या घराचं बोर्डिंग स्कूलमध्ये रूपांतर केलं. त्या ठिकाणी आजही शाळा चालवली जाते.

द्रौपदी मुर्मू यांनी 1994 ते 1997 या काळात रायरंगपूर येथील श्री अरबिंदो इंटिग्रेटेड एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये शिक्षिका म्हणून काम केले. शिक्षिका (Teacher) म्हणून त्यांनी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकवले. शिक्षिका म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या मुर्मू यांनी ओडिशाच्या पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणजेच लिपिक (Clerk) म्हणूनही काम केले. नोकरीतून मिळालेल्या पगारातून त्यांनी घर चालवत त्याची मुलगी इति मुर्मूला शिकवलं. त्यांच्या मुलीलाही कॉलेजनंतर बँकेत (Bank) नोकरी लागली. इति मुर्मू सध्या रांचीमध्ये राहतात, त्याचं लग्न झारखंडमधील गणेश यांच्यासोबत झालं असून दोघांना आद्यश्री नावाची एक मुलगी आहे.

1997 मध्ये मुर्मूंच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात

द्रौपदी मुर्मू यांनी 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी भाजप (BJP) अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. यासोबतच त्या भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या. द्रौपदी मुर्मू 2000 आणि 2009 मध्ये ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दोनदा आमदार (MLA) झाल्या.

ओडिशामध्ये नवीन पटनायक (Navin Patnaik) यांच्या बिजू जनता दल आणि भाजपच्या युती सरकारमध्ये द्रौपदी मुर्मू यांना 2000 ते 2004 दरम्यान वाणिज्य, वाहतूक आणि नंतर मत्स्य आणि पशू संसाधन खात्याचे मंत्री करण्यात आले होते. मुर्मू यांनी रायरंगपूरमधून 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु बीजेडीच्या (BJD) उमेदवाराकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल

द्रौपदी मुर्मू यांना मे 2015 मध्ये झारखंडच्या 9व्या राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांनी सय्यद अहमद यांची जागा घेतली होती. झारखंड उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश वीरेंद्र सिंह यांनी द्रौपदी मुर्मू यांना पदाची शपथ दिली होती. झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल (First Woman Governor of Jharkhand) होण्याचा मानही द्रौपदी मुर्मू यांच्याकडे गेला. तसेच, भारतात कोणत्याही राज्याच्या राज्यपाल झालेल्या त्या पहिल्या आदिवासी व्यक्ती आहेत. झारखंडच्या राज्यपालपदाचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून द्रौपदी मुर्मू आपल्या गावी रायरंगपूरला परतल्या. तिथे त्या पूर्ण वेळ सामाजिक कार्य करू लागल्या.

यंदा महिनाभरापूर्वी म्हणजेच 20 जून रोजी त्यांनी 64 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 21 जून 22 रोजी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांचं नाव एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर त्या निवडणुकीत विजयी झाल्या. लग्नानंतर अवघ्या काही वर्षांत पती आणि मुलांना गमावणाऱ्या द्रौपदी मुर्मू एका छोट्याशा गावातून शिक्षिका, लिपिक, नगरसेवक, आमदार आणि राज्यपाल असा प्रवास करत राष्ट्रपतिपदापर्यंत पोहोचल्या आहेत आपल्या कामाने ते या पदाचाही गौरव वाढवतील अशी अपेक्षा करूया.

First published:

Tags: President