राजस्थानच्या सीमावर्ती बाडमेर जिल्ह्यातल्या चौहटन तालुक्यात असलेल्या पनोरिया गावामध्ये राहणाऱ्या 32 वर्षीय रिक्षाचालक गजेदानला (Auto Driver Gajedan) आयकर विभागाने 4.89 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ही नोटीस पाहून गजेदानला धक्काच बसला. कारण त्याने अशाप्रकारची नोटीस मिळेल अशी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. राजस्थान आयकर विभागानं (Rajasthan Income Tax Department) गजेदानला 32.63 कोटी रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी 4.89 कोटी रुपयांच्या थकबाकी टॅक्सबाबत ही नोटीस पाठवली आहे. हा व्यवहार त्याच्या पॅनकार्डचा वापर करुन एका बिझनेस अकाउंटमार्फत करण्यात आला आहे. गजेदाननं सांगितल्याप्रमाणं, 'तो रिक्षा चालवतो. याचसोबत तो एक दुकान देखील चालवतो. महिन्याला तो 8 ते 10 हजार रुपये कमवतो.'
भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेल्या पनोरिया गावामध्ये राहणारा गजेदानने बाखासर पोलिस ठाण्यामध्ये गेल्या महिन्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यानं असं म्हटलं आहे की, '11 फेब्रुवारी 2021ला राज्याच्या टॅक्स डिपार्टमेंटकडून 4.89 कोटी रुपयांचा टॅक्स भरण्याबाबत मला नोटीस आली आहे.' पीडित गजेदाननं आरोप केला आहे की, 'मी पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक आणि अन्य माहिती चौहटन गावातील एका फायनान्स कंपनीला दिली होती. एका वर्षापूर्वी मी रिक्षा खरेदी केली होती आणि त्यासाठी फायनान्स करण्यासाठी आपली कागदपत्रं दिली होती. रिक्षा चालवण्याव्यतिरिक्त मी किराणा मालाचे दुकान देखील चालवतो. त्याठिकाणी ग्रामीण भागातील लोकांचे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी मी एक-दोन कंपनीचे आयडी घेतले होते. त्यासाठी देखील मी कागदपत्र दिली होती. कोणी तरी माझ्या या कागपत्रांचा वापर करुन फसवणूक केली असावी आणि मला याची माहिती नाही.'
पीडित गजेदाननं आरोप केला आहे की, 'एखाद्या व्यक्तीनं माझ्या नावावर जीएसटी (GST) फर्म मेसर्स एसएलव्ही इंटरनॅशनल नोंदणी केली असावी. ज्याच्या नोंदणीमध्ये मोबाईल नंबर आणि इमेल आयडी माझा नाही. माझ्या नावानं कोणीतरी बनावट फर्मची नोंदणी केली आहे. या फर्मकडून 32 कोटी 63 लाख 65 हजार 440 रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. त्यावर जीएसटी थकबाकी 4 कोटी 89 लाख 99 हजार 724 रुपये असून, चुकीचं ओझं माझ्यावर टाकण्यात आलं आहे. अशाप्रकारचा कोणताही व्यवहार मी कधीच केला नाही.'
गजेदाननं 19 फेब्रुवारीला बाखासर पोलिस ठाण्यामध्ये फसवणूक आणि खोट्या पद्धतीने फर्म तयार करुन करोडो रुपयांचा व्यवहार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र १२ दिवसांनंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. अप्पर पोलिस अधीक्षक नरपतसिंह यांनी सांगितलं की, 'तक्रारदाराच्या तक्रारीच्या आधारे बाखासर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.' महत्वाचं म्हणजे, गजेदाननं बाडमेर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ही बातमी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.