मुंबई, 29 जुलै : पाकिस्तानी महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या DRDOमध्ये काम करणाऱ्या प्रदीप कुरुलकरने तिला भारताच्या अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्टची माहिती देण्याचं आश्वासन दिलं होतं असं समोर येत आहे. यात ब्रह्मोस मिसाइल योजनेबाबत असलेल्या गुप्त अहवाल दाखवण्याचाही समावेश होता. या प्रकरणी महाराष्ट्र एटीएसच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार प्रदीप कुरुलकरने व्हॉटसअप चॅटमध्ये म्हटलं होतं की, ब्रह्मोस मिसाइलचा गुप्त रिपोर्ट दाखवेन. पाकिस्तानी महिलेने प्रदीप कुरुलकरला भेटीवेळी स्वत:चं नाव जारा दासगुप्ता असं सांगितलं होतं. हनी ट्रॅप प्रकरणी डीआरडीओच्या प्रयोगशाळेचा प्रमुख असलेल्या कुरुलकरला ३ मे रोजी एटीएसने अटक केली होती. हेरगिरी आणि पाकिस्तानी महिलेशी संपर्क ठेवल्या प्रकरणी त्याला ताब्यात घेतलं होतं. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी महिलासुद्धा या प्रकरणी वाँटेड आरोपी आहे. महिलेने व्हॉटसअपवर कुरुलकरशी संपर्क केला होता. तिने ब्रिटनमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचं सांगितलं होतं. कुरुलकरला अश्लील मेसेज, व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करण्याचं आमिष दाखवलं. कुरुलकरने महिलेशी १० जून २०२३ ते २४ फेब्रुवारी २०२३ दरम्यान तिच्याशी अनेकदा संवाद साधला. Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात गोन्साल्विस आणि फरेरा यांना जामीन मंजूर एटीएसने आरोप केला आहे की, भारताच्या डीआरडीओ आणि अनेक सुरक्षा प्रोजेक्टबाबत जाराला गोपनीय माहिती कुरुलकरकडून काढून घ्यायची होती. कुरुलकर तिच्या जाळ्यात फसला होता आणि गुप्त माहिती देण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला. तपासावेळी एटीएसने दोघांमधील व्हॉटसअप चॅट रिकव्हर केलं. या चॅटिंगचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. दोघांनी १९ ऑक्टोबर २०२२ ते २८ ऑक्टोबर २०२२ या काळात ब्रह्मोसबाबत चर्चा केली होती. कुरुलकरने जाराच्या प्रश्नावर म्हटलं होतं की, माझ्याकडे ब्रह्मोसचा डिजाइन रिपोर्ट आहे. यानंतर कुरुलकरने महिलेला ऑनलाइन कॉपी पाठवू शकत नाही असं सांगितलं. मेलही करू शकत नाही, हे अत्यंत गोपनीय आहे. तू इथे असशील तेव्हा दाखवण्याचा प्रयत्न करेन असेही महिलेला सांगितलं. आरोपपत्रात एटीएसने दोघांमधील चॅटचा उल्लेख केला आहे. माहिती अत्यंत गुप्त आहे याची कल्पना कुरुलकरला होती. त्याने हे व्हॉटसअप किंवा इमेलवर पाठवलं नाही. पण कुरुलकरने जाराला ते प्रत्यक्षात भेटल्यावर सांगेन असं म्हटल्याचं एटीएसने आरोपपत्रात म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.