डॉक्टरांनी केलं मृत घोषित, मात्र रात्री अचानक हालचाल करू लागला व्यक्ती; पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं

डॉक्टरांनी केलं मृत घोषित, मात्र रात्री अचानक हालचाल करू लागला व्यक्ती; पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं

रात्रीच्या 11:30-11:45 वाजता त्या व्यक्तीची मुलगी सना मृतदेहाजवळच बसली होती. तिनं सांगितलं, की चादर हळूहळू हालताना तिला दिसली. यानंतर तिनं आपल्या आईला याबाबतची माहिती दिली.

  • Share this:

लखनऊ 30 एप्रिल : कोरोनानं (Coronavirus) देशभरात हाहाकार घातला असतानाच रुग्णालयांच्या हलगर्जीपणाबाबतही अनेक बातम्या समोर येत आहेत. अशीच आणखी एक बातमी समोर आली आहे उत्तरप्रदेशत्या सुल्तानपूर जिल्ह्यातून. इथे डॉक्टरांनी एका व्यक्तीला मृत (Dead) घोषित केलं. यानंतर कुटुंबीयांवर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह घरी आणला. मात्र, अचानक मृतदेहावर टाकण्यात आलेली चादर सरकल्याचा भास त्यांना झाला. कुटुंबीयांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांनी लगेचच शेजारच्या एका डॉक्टरला (Doctor) बोलावून घेतलं. तपासणी केली असता असं समोर आलं, की पल्स (Pulse) आणि ऑक्सिजन लेवल (Oxygen Level) दोन्ही व्यवस्थित आहे. रडणाऱ्या या कुटुंबीयाच्या चेहऱ्यावर अचानक हसू खुललं.

कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि या व्यक्तीला उपचारासाठी लखनऊमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, कुटुंबीयांचा आनंद फार काळ टिकला नाही आणि सात तासांनंतर या रुग्णाचा मृत्यू झाला. कोतवाली नगर क्षेत्रातील दरियापूर परिसरात राहाणाऱ्या अब्दुल माबूद यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अब्दुल यांच्या भावाच्या पत्नीनं सांगितलं, की त्यांना ऑक्सिजनची गरज होती. गुरुवारी सुमारे दोन वाजता त्यांना सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर त्यांना तीन ते चार इंजेक्शन देण्यात आले. यानंतरही रुग्णाला त्रास होत होता. मात्र, डॉक्टरांनी ऑक्सिजन सिलेंडरच शिल्लक नसल्याचं सांगितलं.

रुग्णाला बरं वाटत नसल्यानं सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. तिथे त्यांची पल्स रेट आणि ऑक्सिजन लेवल अत्यंत खालावली असल्याचं समोर आलं. खासगी रुग्णालयातही डॉक्टरांनी रुग्णाला दाखल करुन घेण्यास नकार दिला. असं सांगण्यात आलं, की तिथे घेऊन जा, जिथे ऑक्सिजन शिल्लक आहे. शेवटी रुग्णाला पुन्हा सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. इथे गेल्यानंतर छातीवर पंप करुनही काहीच प्रतिसाद न मिळाल्यानं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय संध्याकाळी मृतदेह घेऊन आपल्या गावी गेले. नातेवाईकांना याबाबतची माहिती देण्यात आली आणि शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्याचं ठरलं. यामुळे रात्री मृतदेह घरीच ठेवण्यात आला. रात्रीच्या 11:30-11:45 वाजता त्या व्यक्तीच्या मुलगी सना मृतदेहाजवळच बसली होती. तिनं सांगितलं, की चादर हळूहळू हालताना तिला दिसली. यानंतर तिनं आपल्या आईला याबाबतची माहिती दिली. यानंतर बाहेर काढण्यात आला, यावेळी असं जाणवलं की संबंधित व्यक्ती श्वास घेत आहे.

मृताच्या भावानं सांगितलं, की मुलीनं सांगितलं, की बाबा हालचाल करत आहेत. मी लगेचच हात लावून बघितला तेव्हा जाणवलं की हृदयाचे ठोके सुरू आहेत. यानंतर तोंडानं त्यांना हवा दिली. तोपर्यंत डॉक्टर आले होते. त्यांनी तपासणी केली असता समोर आलं, की पल्सही सुरू आहे. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र शुक्रवारी सकाळी तीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

Published by: Kiran Pharate
First published: April 30, 2021, 4:14 PM IST

ताज्या बातम्या