मराठी बातम्या /बातम्या /देश /

Digital Prime Time : मुलं..?? आमचा आनंद बघवत नाही का? दोघांचाच सुखी संसार!

Digital Prime Time : मुलं..?? आमचा आनंद बघवत नाही का? दोघांचाच सुखी संसार!

 प्रत्येक वेळी आपले निर्णय समाजाच्या चौकटीत बसतीलच असं नाही. अनेकदा ते प्रवाहाच्या विरोधातही असतात. याचा अर्थ ते चूक आहेत, असं मानणं योग्य नाही.

प्रत्येक वेळी आपले निर्णय समाजाच्या चौकटीत बसतीलच असं नाही. अनेकदा ते प्रवाहाच्या विरोधातही असतात. याचा अर्थ ते चूक आहेत, असं मानणं योग्य नाही.

प्रत्येक वेळी आपले निर्णय समाजाच्या चौकटीत बसतीलच असं नाही. अनेकदा ते प्रवाहाच्या विरोधातही असतात. याचा अर्थ ते चूक आहेत, असं मानणं योग्य नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीला आयुष्याकडून काहीतरी हवं असतं. आणि त्यासाठी तसे प्रयत्नही करावे लागतात. प्रत्येक वेळी आपले निर्णय समाजाच्या चौकटीत बसतीलच असं नाही. अनेकदा ते प्रवाहाच्या विरोधातही असतात. याचा अर्थ ते चूक आहेत, असं मानणं योग्य नाही.

माझं नाव दुर्गा (नाव बदललेलं आहे)....राहणारी मुंबईतलीच. आज News18 लोकमतच्या माध्यमातून मला माझा अनुभव कथन करता येतोय, याचा खूप आनंद आहे. मी माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय घेतला, त्यावेळी बराच विरोध झाला होता. त्यात एक स्त्री असल्या कारणाने प्रत्येकाच्या अपेक्षाचं ओझं पाठिशी होतच. मात्र लग्नानंतर ते अधिक वाढलं. लग्नाच्या पहिल्या वर्षात मूल व्हावं अशी अपेक्षा करणारी माझ्या आजूबाजूची माणसं 7 वर्षांनंतरही मूल होत नाही या विचाराने हादरलीच.

पण माझा निर्णय झाला होता. मला मूल नकोच होतं. आणि विशेष म्हणजे तरीही मी खूप खूप आनंदात होते. कदाचित कोणाला विचित्र वाटेल पण, मला मूल नको हा विचार महाविद्यालयीन काळातच माझ्या डोक्यात येऊन गेला होता. लग्नाच्या आधीही आयुष्यात आलेल्या मुलांनी मूल होण्यासंबंधात विषय काढला तर मी दबकायचे. हा विषय नकोच, असं वाटायचं. लग्नाच्या 7 वर्षांनंतरही हा विचार काही मनातून गेला नाही.

सुरुवातीला तर एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं का, असाही विचार येऊन गेला. पण आपल्या आयुष्यात एखादं तरी मूल असावं असा विचार कधीच आला नाही. त्या ममत्वाची भावना मला कधीच आली नाही. बरं, मला मूलं आवडत नाहीत अशातला भाग नाही. ‘मला मूलं आवडतात, पण दुसऱ्यांची’. भाऊ, मित्र-मैत्रिणींच्या मुलांसोबत खेळायलाही मला आवडतं.

मूल होऊ देणं जितकं सहज आहे तितकच मूल न होणंही आहे, हे समाजाने समजून घ्यायला हवं. कुणाच्याही घरी गेले तरी आजही मला किती मूलं, म्हणून प्रश्न विचारला जातो. त्यावर मी हसत हसत ‘नाही’ असंच उत्तर देते. त्यानंतर कुजबूज होते, तर काही वेळा आयव्हीएफचा सल्ला दिला जातो. अशावेळी कितीजणांना काय काय उत्तरं द्यायची, हे मला अजूनपर्यंत न उलगडलेलं कोडं आहे. अशावेळी हो म्हणून मी शांत राहते.

पण अनेकदा याची चीड येते. माझं आयुष्य समृद्ध आणि पूर्ण होण्यासाठी मी आई होणं किंवा मला मूल असणं हे खरच इतकं महत्त्वाचं आहे का? अन्यथा लोकांना कायम मी अपूर्ण असल्यासारखीच भासत राहणार का? आणि समाजदेखील मला वारंवार तू विचित्र आहेस, असं दाखवत राहणार का? मी आधी म्हटलं तसं मूल होणं जितकं साहजिक आहे, तितकच ते न होणंही आहे.

आता आपण यावर सविस्तरच बोलू. मी मांडलेल्या भूमिकेतून कोणालाही दुखवायचा हेतू नाही. पण मी काय अनुभव घेते, हे सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न...

मूल नसण्याचे काही फायदे...

मूल नाही म्हणून मी दु:खी आहे, असं अनेकांना वाटत असंत. पण मी खूप आनंदात आहे. खरं पाहता मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही छान जगतोय.  आम्ही दोघंही खूप काम करतो...खूप भटकंती करतो...विशेष म्हणजे आमच्यात पती-पत्नींमध्ये होतात तशी वारंवार भांडणही होत नाहीत. दोघंही आपआपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूरेपूर प्रयत्न करतो. खूप वाचन करतो...वैचारिक वादही घालतो. कधी इच्छा झाली की, लगेच गाडीवर टांग टाकून दोघेही मनसोक्त बागडतो. कधी एखाद्या संस्थेला भेट देतो. ज्याला जशी आर्थिक मदत करता येईल तशी करत असतो. आपलं आयुष्य आपल्या इच्छेप्रमाणे वागतो.

मूल नसल्यामुळे स्वत:साठी बराच वेळ मिळतो. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या फार ताणही येत नाही. हे विचार टोकाचे वाटत असतील, पण यात तथ्य आहे आणि हे नाकारता येणार नाहीत.

-या 10 वर्षांच्या काळात मला वारंवार विचारले गेलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं...

मूल म्हातारपणातील आधार म्हणून....

म्हातारपणात कोणीतरी सांभाळ करावा, आपला आधार व्हावा म्हणून एखादं तरी मूल होऊ दे असं सांगणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. पण सध्याच्या काळात खरच मूलं म्हातारपणात आधार होतात का? कदाचित आपल्या घरात आणि आजूबाजूला जरा लक्ष देऊन पाहिलं तर तुमचं उत्तर तुम्हालाच गवसेल.

आपला वंश कसा वाढेल?

असा प्रश्न विचारणाऱ्यांची खरंच मला दया येते. पणजोबा सोडाच पण आजोबांचं नाव विचारलं तरीही आपल्याला काही सेकंद विचार करावा लागतो. त्यात कोणाचा वंश किती वाढला याने खरंच जगात कोणाला तरी फरक पडतो का?

आजी-आजोबांचा वेळ कसा जाईल?

मूळात मूल ही काही टाइमपासची गोष्टी नाही, असं मला तरी वाटतं. वेळ जात नाही, म्हणून मूल जन्माला घाला आणि त्याला मोठं करा असा यामागे दृष्टीकोन नसावा. तसं पाहता म्हातारपण सुखात जावं, यासाठी जगात बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. ज्या केल्याने अधिक आनंद तर मिळेलच पण माणसंही अधिक समृद्ध होतील.

संपत्तीचं काय?

हो.., हा थोडा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही जे काही कमावलं आहे, त्या तुमच्या संपत्तीचं काय? म्हातारपणापर्यंत जीवंत राहिले तर ‘विकून खाईन’. आणि म्हातारपणा आधीच मृत्यू आला तर कोणत्या चांगल्या संस्थेला दान करू शकेन. किंवा अगदीच माझ्या कुटुंबातील एखाद्या ‘गरजू’च्या नावावर करता येईल.

मूलं नसतानाही मी पाच जणांची ‘आई’....

खरंच सांगते, नवरा, आई-बाबा, सासू-सासरे हे काही लहान मुलांपेक्षा कमी नाहीत. त्यांचे हट्ट पुरवणं, त्यांचं आजारपण यात अगदी माझी आईसारखी कसोटी लागते. स्वत: मूल असतं तर कदाचित आई-बाबांसाठी इतकं करता आलं नसतं, याचीही जाणीव होते.

शेवटी काय, एखाद्या स्त्रीला मुलाची इच्छा नसणं हे अत्यंत सहज आहे. त्यावरुन खरच राडा घालण्याची गरज नाही.

टीप : माझ्यासारख्या अनेकांनी 'मूल नको', हा निर्णय घेतला आहे. यामागे समोरच्यांनेही असंच वागावं, अशी अपेक्षा वा अट्टाहास नाही. फक्त आम्ही घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार करावा, ही माफक अपेक्षा आहे.

First published:

Tags: Couple, FAMILY, Parents and child