पणजी, 10 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. या निवडणुकीचं बिगूल वाजल्यापासून अनेक गोष्टी चर्चेत आल्या होत्या. विशेषत: भाजपने जेव्हा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली तेव्हा अनेक घडामोडी घडल्या. भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचं नाव चांगंलंच चर्चेत आलं. पर्रीकर यांना पणजीतून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवारी लढवली. तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पर्सेकर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत तेच केलं. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आल्याचं चित्र होतं. पण आता उत्पल पर्रीकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला. उत्पल यांच्या पराभवानंतर गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत उत्पल यांच्याविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं. उत्पल पर्रीकर यांचा पराभव झाल्याने त्यांना पुन्हा भाजपात सहभागी करुन घ्याल का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “आम्ही उत्पलला तिकीट पण दिलं. भाजप हे पर्रीकर यांचं घर आहे. पण असं कुणी लढलं तर केंद्रीय कमिटी त्याबाबत निर्णय घेणार. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पर्सेकर यांना तर पक्षाने सगळी पद दिली तरी त्यांनी बंडखोरी केली याचं दुःख आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “गोव्याच्या जनतेने एक अतिशय चांगला विजय जनतेने दिला. त्याबद्दल गोव्याच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ज्याप्रमाणे सांगतिलं, हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पित आहे. मोदींनी विश्वासहर्ताची जी मालिका सुरु केली त्यामुळेच चारही राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला. गोव्याच्या नागरिकांनी डब्बल इंजिनचं सरकार गेल्या पाच वर्षात अनुभवलं. गोव्याचा चेहरा गेल्या पाच वर्षात बदलला. त्यामुळे विश्वासहर्ता आणि विकास याच्या आधारावर गोव्याच्या जनतेने भाजपला मते दिली. त्यामुळे भाजपचा 20 जागांवर विजय झाला आहे. त्याचबरोबर तीन अपक्षांनी भाजपला समर्थन दिलं आहे. आमचे 21 आले तरी आम्ही काही लोकांना सोबत घेऊन जाणार आहोत. अपक्षांसह महाराष्ट्रवादी गोमंतकपार्टीने देखील भाजपला समर्थनाचं पत्र दिलं आहे. मी एमजीपीचे आभार मानतो. त्यामुळे 25 सदस्यांच्या बहुमताने आम्ही सरकार स्थापन करु.”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ( ‘ठाकरे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं’, काँग्रेसच्या दिग्गज खासदाराचा दावा ) “भाजपमध्ये पद्धत आहे. आता आमची सेंट्रल पार्लमेंट्री बोर्डाची बैठक होईल. या बैठकीत गोव्याकरताही एक सेंट्रल ऑब्जर्वर नियुक्त होतील. त्यानंतर बैठक होऊन आम्ही राज्यपालांकडे जाऊ. आम्हाला बहुमत मिळाल्याने धावपळ करण्याची आवश्यकता नाही. काँग्रेसला त्यांनाच बहुमत मिळत असं वाटतं होतं. त्यामुळे त्यांनी कालच राज्यपालांची वेळ घेतली होती. पण आता त्यांच्याकडे जाण्यालायक काहीच नव्हतं. राज्यपाल वाट पाहत होते. पण ते गेले नाहीत”, असंदेखील फडणवीस म्हणाले. “गोव्यात आमच्या सरकारने अतिशय चांगलं काम केलं. भाजपच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या कामाचा हा विजय आहे. पुढची पाच वर्षे ही गोव्याच्या समृद्धीची आहेत”, असं फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.