नवी दिल्ली 14 मार्च : समाजाचं संरक्षण करण्यासोबतच समाजात सौहार्द राखण्याची जबाबदारीही पोलीस खात्यावर असते. पण गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण बघता त्यांना मनुष्यबळाची कमतरता जाणवते. मग आहे त्या स्रोतांचा उपयोग करून समाजासाठी काही उपक्रम पोलीस राबवतात. दिल्लीतील आर. के. पुरम पोलीस स्टेशनचे प्रमुख (SHO) राजेश शर्मा यांनी त्यांच्या पोलीस ठाण्यात एक ग्रंथालय (Library for Slum Childrens) आणि स्मार्ट क्लासरूम सुरू केली आहे. दी दिल्ली पोलीस पब्लिक लायब्ररी (Delhi Police Public Library) असं या ग्रंथालयाचं नाव असून या ग्रंथालयात कॉमिक्सपासून वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं, कॉम्प्युटर इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. हे कुणासाठी असं विचाराल तर ते आहे झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी. पोलीस स्टेशनच्या परिसरात असलेल्या झोपडपट्ट्यांमधील मुलांना अभ्यासासाठी शांत आणि सुरक्षित जागा नाही. कोरोनाच्या काळात शाळा बंद आहेत, त्यामुळे त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही लायब्ररी सुरू केली आहे. हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना राजेश शर्मा म्हणाले, ‘सध्या शाळा बंद आहेत, झोपडपट्टीत घरात जागा नसते त्यामुळे ही मुलं दिवसभर रस्त्यावर फिरत असतात आणि मग त्या माध्यमातून गुन्हे आणि ड्रगच्या व्यसनात लिप्त होतात. पोलीस म्हणून तरुणांना योग्य मार्ग दाखवणं हेही आमचं काम आहेच. त्याचा विचार करून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.’ ही लायब्ररी सुरू झाल्यापासून सुमारे 70 मुलं इथं येत असतात. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही लायब्ररी सुरू असते. यात 2300 पुस्तकं, 1900 नियतकालिकं आणि 15 वृत्तपत्र मुलांना उपलब्ध आहेत. दिवसभर मुलं कॉम्प्युटरवर इंटरनेट वापरू शकतात. काउन्सेलिंग आणि स्पर्धा परीक्षांचं मोफत मार्गदर्शन करणाऱ्या एका एनजीओशी या लायब्ररीने सहकार्य करार केला आहे. ‘ जवळजवळ गेलं वर्षभर शाळा बंद आहेत. आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या मुलांना त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करता येत नाही. त्यांना अभ्यासाला शांत अशी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळं कॉमिक्सपासून स्पर्धात्मक परीक्षांपर्यंत सर्व पुस्तकं इथं ठेवण्याचा आमचा मनोदय आहे. दिल्ली पोलिसांनी या आधी जामिया नगर पोलीस स्टेशनमध्ये अशी लायब्ररी सुरू केली होती. त्यानंतर सुरू झालेली ही दुसरी लायब्ररी आहे,’ असं राजेश शर्मा यांनी द न्यू इंडियन एक्सप्रेसला सांगितलं. या लायब्ररीत एकावेळी 100 मुलं बसून अभ्यास करू शकतात. प्रिंटमध्ये दिलेल्या वृत्तानुसार गोव्याच्या एशिया पॅसिफिक चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीनं या लायब्ररीला 28 फेब्रुवारी रोजी शिक्षणाची अनोखी पद्धत अवलंबल्याबद्दल प्रशस्तिपत्रक देण्यात आलं आहे. ऑनलाईन क्लाससाठी अनेक विद्यार्थी या लायब्ररीत येऊन बसतात. दिल्ली पोलिसांनी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे त्यातून नक्कीच काही मुलं शिकून पुढे जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.