नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : निक्की यादव हत्येचं प्रकरण अद्याप शांत झालेलं नाही तोच देशाची राजधानी दिल्लीतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये आणखी एका महिलेचा खून झाला आहे. तिच्या लिव्ह-इन पार्टनरनं तिच्या अंगावर टर्पेन्टाइन ऑईल टाकून आग लावली होती. या घटनेनंतर पीडित महिलेला एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथेच सोमवारी तिचा मृत्यू झाला. पीडितेचं तिच्या लिव्ह इन पार्टनरशी भांडण झाल्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, मृत पीडितेनं तिच्या लिव्ह-इन पार्टनरला मित्राच्या घरी ड्रग्ज घेताना पकडलं होतं. त्यानंतर दोघांचं भांडण झालं. याचा राग येऊन आरोपी मोहितनं तिच्या अंगावर टर्पेन्टाइन ऑईल ओतून तिला पेटवून दिलं. एका महिलेला भाजलेल्या अवस्थेत एसजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती 11 फेब्रुवारी रोजी अमन विहार पोलीस स्टेशनला मिळाली होती.
हे ही वाचा : अफेअर, पैसा अन् मर्डर…पत्नीला हवा प्रियकर, लेक पैशांचा भुकेला; दोघांनी रचला भयंकर कट
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ रुग्णालय गाठलं. नियमानुसार पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेण्याचा प्रयत्न केला. पण, ती जबाब देऊ शकली नाही. यानंतर पीडितेला पुढील उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात आणि नंतर एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आलं. तपासादरम्यान असं आढळून आलं की, पीडित महिला तिच्या पहिल्या पतीला सोडून गेल्या सहा वर्षांपासून मोहित नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती.
पोलिसांनी सांगितलं की, 28 वर्षीय पीडित महिला एका फुटवेअर कारखान्यात मजूर म्हणून काम करत होती. या महिलेला, अगोदरच्या पतीपासून झालेला आठ वर्षांचा मुलगा आणि सध्याच्या नात्यातून झालेली चार वर्षांची मुलगी, अशी दोन मुलं आहेत. सोमवारी एम्समधील ट्रॉमा सेंटरनं माहिती दिली की, उपचारांदरम्यान या पीडितेचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी आरोपी मोहितला ताब्यात घेतलं असून अमन विहार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
हे ही वाचा : लग्नाच्या 6 महिन्यातच पती-पत्नीमध्ये वाद, प्रकरण कोर्टात अन् घडलं भयानक
गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये एकापाठोपाठ एक भयानक हत्याकांड उघडीस आली आहेत. श्रद्धा वालकर, अंजन दास आणि निक्की यादव या तीन व्यक्तींचे प्रेम प्रकरणातून खून झाले आहेत. श्रद्धाच्या केसमध्ये तिचा लिव्ह-इन-पार्टनर आफताब पूनावाला यानं तिची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. त्यानंतर अंजन दासच्या केसमध्ये त्याची पत्नी आणि मुलानंदेखील अशाच प्रकारे त्याचा खून केला होता. या दोन्ही हत्याकांडांचा तपास सुरू असतानाच 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा अशीच एक घटना उघडकीस आली होती. ज्यामध्ये साहिल गेहलोत नावाच्या व्यक्तीनं लिव्ह-इन पार्टनर निक्की यादवचा खून केला होता.