नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : जवाहरलाल विद्यापीठ (JNU) हे गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत आणि देशभरातही राजकारणाच्या अग्रभागी राहिलं आहे. नागरिकत्व कायदा बदल (CAA) विरोधातलं आंदोलन असो किंवा त्याआधी कन्हैय्या कुमारमुळे गाजलेली घोषणाबाजीचं आंदोलन असो JNU च्या कँपसमधून नेहमीच उजवे आणि डावे असा कट्टर संघर्ष दिसून आलेला आहे. नुकतंच पंतप्रधान मोदींच्या हस्ते कँपसमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. या पुतळ्यालाही काही विद्यार्थी संघटनांनी विरोध केला होता. आता भाजपने विद्यापीठाचं नामांतर करण्याचाच घाट घातल्याची चर्चा आहे. निमित्त ठरलं आहे भाजपच्या सरचिटणीसांचं Tweet द्वारे केलेलं वक्तव्य.
भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस (BJP General Secretary) सी.टी रवी (CT Ravi) यांनी सोमवारी ही नवी मागणी केली आहे. 'भारताचे हे राष्ट्रसंत पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरलेले आहेत. भारताची कल्पना पहिल्यांदा जगासमोर मांडणारे स्वामी विवेकानंद होते. त्यांचं तत्त्वज्ञान आणि मूल्य भारताची ताकद दाखवणारे आहेत. म्हणूनच या महान व्यक्तिमत्वाचं नाव JNU ला द्यायला हवं', अशा अर्थाचं त्यांनी Tweet केलं आहे.
It is Swami Vivekananda who stood for the "Idea of Bharat". His philosophy & values signify the "Strength of Bharat". It is only right that Jawaharlal Nehru University be renamed as Swami Vivekananda University. Life of Bharat's patriotic Saint will inspire generations to come.
— C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ (@CTRavi_BJP) November 16, 2020
विचारसरणीत फरक असू शकतो. तुम्हाला विशिष्ट विचारसरणी पटली नाही तरी कुठलीही विचारसरणी ही राष्ट्रहिताला पूरकच असली पाहिजे. राष्ट्रविरोधी नाही, असं पंतप्रधान मोदी विवेकानंदांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी म्हणाले होते.
JNU मध्ये अनेक काळ डाव्या विचारसरणीच्या व्यक्तींचं प्रभुत्व राहिलेलं आहे. डाव्यांचा बालेकिल्ला म्हणूनच हे विद्यापीठ ओळखलं जातं. गेल्या काही वर्षांपासून इथे डाव्यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या जवळची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) प्रयत्नात आहे. अभाविप विरुद्ध डाव्यांच्या विद्यार्थी संघटना असा संघर्ष JNU मध्ये नेहमीचाच आहे. डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना राष्ट्र द्रोही असल्याचा आरोप अभाविपकडून नेहमीच होत असतो. आता भाजपच्या नव्या मागणीमुळे JNU चं नाव आणि ओळखच बदलायच्या मार्गावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.