नवी दिल्ली, 01 जानेवारी : दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात आज (दि.01) रविवारी पहाटे एका नर्सिंग होममध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज पहाटे 5.15 वाजता घडली. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून 6 जणांची सुटका केल्याची माहिती समोरआली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली. सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणून परिस्थिती नियंत्रणात आणली.
ग्रेटर कैलास 2 च्या ई ब्लॉगमध्ये एका ज्येष्ठ नागरिक सेवा गृह आहे त्या ठिकाणी ही आग लागल्याची माहिती आहे. ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणारे हे केंद्र आहे. याबाबत आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस पथक घटनास्थळाची पाहणी करत आहेत.
यापूर्वी 17 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतील ग्रेटर कैलास पार्ट-1 येथील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये आग लागली होती. रुग्णालयाच्या तळघरात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. फिनिक्स रुग्णालयात सकाळी 9.30 वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली.
हे ही वाचा : मुंबई मेट्रोच्या दरवाजात अडकला ड्रेस; इतक्यात ट्रेनही सुरू झाली, पुढे तरुणीसोबत भयानक घडलं, VIDEO
दिल्लीत आगीच्या घटनांमध्ये वाढ
29 डिसेंबर 2022 रोजी, दिल्ली पोलिसांनी आग लागलेल्या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या 14 लोकांना वाचवले. ही घटना दिल्लीतील संगम विहार भागातील आहे. पोलिसांनी सांगितले की 14 लोक (4 महिला, 4 पुरुष आणि 6 मुले) एकाच कुटुंबातील आहेत.
तर मागच्या महिन्यात 25 नोव्हेंबर 2022 रोजी चांदणी चौकातील इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याचीही घटना घडली होती. अग्निशमन दलाच्या 150 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत 200 दुकाने जळाली, तर 5 इमारती पूर्ण जळाल्या होत्या.
याशिवाय 3 इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीच्या घटनेनंतर दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी इलेक्ट्रॉनिक मार्केटला भेट दिली. लटकणाऱ्या तारा आणि ओव्हरलोड सर्किट्स यासारख्या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्याचे मार्ग शोधण्यासाठी त्यांनी एक बहु-अनुशासनात्मक समिती स्थापन केली.
हे ही वाचा : बाथरूमच्या दरवाजाचा हँडल तुटल्याने 4 दिवस आतच बंद राहिली महिला; दरवाजा तोडताच या अवस्थेत दिसली
गेल्या वर्षी 13 मे रोजी पश्चिम दिल्लीतील मेट्रो स्टेशनजवळील एका व्यावसायिक इमारतीला आग लागली होती. या अपघातात 27 जण भाजल्याने किंवा गुदमरल्याने मृत्यूमुखी पडले, तर 12 जणांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी घेतल्याने जखमी झाले.