नवी दिल्ली, 9 जुलै : कोविड-19 महामारीतून देश बाहेर पडत आहे. दुसरी लाट जात असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता आता वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यातच आता सायटोमगलो व्हायरस (Cytomegalo virus) या विषाणूचं संक्रमण होऊन लोक आजारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत या विषाणूची बाधा झालेले 6 कोविड-19 रुग्ण सापडले आहेत.
सायटोमेगलो व्हायरस काय आहे?
हा विषाणू सामान्य हर्पीज व्हायरस आहे. या विषाणूची बाधा झाल्यावर लक्षणं दिसत नाहीत. त्याने बाधित होणाऱ्या माणसांची संख्या पण फारच कमी आहे. हा विषाणू (Virus) तुमच्या शरीरात सुप्तावस्थेत असतो. गर्भवती महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांना या सायटोमेगलो व्हायरसची बाधा झाली तर गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
संसर्ग कसा पसरतो?
मानवी शरीरातील द्रव रक्त (Blood), लाळ (Saliva), मूत्र (Urine) किंवा अश्रूंच्या माध्यमातून म्हणजे त्याच्या संपर्कात आल्यास हा विषाणू पसरतो. गर्भवती मातेकडून याची लागण बाळाला होऊ शकते आणि नंतर याची लक्षणं बाळाच्या आरोग्यात झालेल्या बदलांतून लक्षात येतात. खरं तर हा विषाणू 40 वर्षांपूर्वी सापडलेला आहे पण आता कोविड-19 च्या (Covid-19) रुग्णांमध्ये ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा रुग्णांवर हा विषाणू हल्ला करत आहे.
सायटोमेगलो व्हायरसची लागण कुणालाही होऊ शकते -
अमेरिकेतील डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन्स (CDC) संस्थेच्या अंदाजानुसार या विषाणूची लागण झालेले 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण 40 पेक्षा अधिक वयाचे असतात. या विषाणूची लागण महिला, पुरूष आणि कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. या विषाणूची लागण झाली, तर त्याला किती गंभीर आजार होईल हे ज्याला लागण झाली आहे त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीवर अवलंबून असतं.
निरनिराळी लक्षणं -
सायटोमेगलो व्हायरसचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांची लक्षणंही निरनिराळी असतात. या लक्षणांचं प्रमाणही कमी-जास्त होऊ शकतं. अक्वायर्ड सायटोमेगलो व्हायरसची लागण झाल्यास ताप येणं, घाम येणं, थकल्यासारखं वाटणं, अस्वस्थता, घसा खवखवणं, सांधेदुखी आणि स्नायूदुखी अशी लक्षणं दिसून येतात. त्याचबरोबर भूक कमी होते. वजनही कमी होतं, पण ही लक्षणं 2 आठवड्यांत कमी होऊन रुग्ण बरा होतो.
पुन्हा पुन्हा सायटोमेगलो व्हायरसची लागण होणाऱ्या रुग्णाच्या प्रकृतीवर लक्षणं अवलंबून असतात. फुफ्फुसं, डोळे, पचनक्रिया यांच्यावर प्रामुख्याने हा विषाणू हल्ला करतो. ताप येणं, जुलाब, पेटाचा अल्सर, रक्त वाहणं, दम लागणं, न्यूमोनिया, तोंड येणं, दृष्टी क्षीण होणं, मेंदूला सूज येणं अशी लक्षण रुग्णाच्या प्रकृतीनुसार दिसू शकतात. कधीकधी तर रुग्ण कोमातही जाऊ शकतो. जर तुम्हाला घरी रुग्णामध्ये ही लक्षणं दिसली तर तातडीने डॉक्टरांची मदत घ्या.
कॉन्जेनिटल सायटोमेगलो व्हायरसचा संसर्ग सर्वांत भयंकर आजार आहे. ज्या बाळांना जन्मत: सायटोमेगलो व्हायरस संसर्ग होतो त्यातल्या फक्त 10 टक्के बाळांनाच कॉन्जेनिटल सायटोमेगलो हा आजार होतो. पण हा झाला तर एखाद्या कानाची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे जाऊ शकते. यात न्यूमोनिया, यकृत निकामी होणं, चक्कर येणं, लहानपणापासून वजन कमी असणं अशी लक्षणं दिसून येतात. नंतर या मुलांना ऑटिझम, चक्कर येणे हे आजार होऊ शकतात.
उपचार काय आहेत?
शास्रज्ञ अजूनही सायटोमेगलो व्हायरसवरची लस शोधत आहेत आणि त्याच्यावर निश्चित असा कोणताच इलाज नाही. या आजाराची लक्षणं सुरुवातीला दिसत नाहीत त्यामुळे लोक वेदनाशामक औषधं घेतात. ते बरोबरही आहे, पण ती लक्षणं वाढली तर डॉक्टरांकडे जायला हवं. ही लक्षणं दिसली तर सातत्याने भरपूर पाणी प्यायला हवं. गंभीर रुग्णांनी डॉक्टरांकडून औषधं घ्यावीत जेणेकरून संसर्ग पसरणार नाहीत.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सायटोमेगलो व्हायरसचा कोविड-19 या आजाराशी किती संबंध आहे हे सर्वांत महत्त्वाचं आहे. सायटोमेगलो व्हायरसची लागण होणं आणि कोविड-19 ची लागण होणं या दोन्हींमध्ये कमकुवत रोगप्रतिकारशक्ती ही गोष्ट महत्त्वाची ठरते. कोविड-19 मुळे माणसाची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि मग सायटोमेगलो व्हायरस त्यावर हल्ला चढवू शकतो. ज्यांना इतर व्याधी आहेत त्यांच्यासाठी हा संसर्ग अधिक धोकादायक असतो. त्यामुळे सावधानता बाळगणं प्रचंड महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus