दिल्ली, 10 फेब्रुवारी : भारताच्या पशु कल्याण बोर्डाने १४ फेब्रुवारी रोजी काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. आता केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर बोर्डाने हे आवाहन मागे घेतलं आहे. बोर्डाकडून आवाहन करण्यात आलं होतं की, १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याऐवजी काऊ हग डे साजरा केला जावा. गाईंना मिठी मारावी असं बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं. दरम्यान, यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर हे आवाहन बोर्डाने मागे घेतलं आहे.
जगभरात विशेषत: पाश्चात्य देशात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. मात्र भारतात काही धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांनी याला विरोध केला. अनेक संघटनांकडून १४ फेब्रुवारीला दुसरा कोणतातरी दिवस साजरा करण्याचंही आवाहन करतात. पहिल्यांदाच भारतात सरकारी संघटनेकडून १४ फेब्रुवारी या दिवशी अशा प्रकारचं आवाहन कऱण्यात आलं होतं. यावरून वाद निर्माण झाला होता. तसंच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला.
हेही वाचा : गाईला मिठी मारण्याचेही आहेत फायदे? जाणून घ्या
वाढत्या विरोधानंतर पशु कल्याण बोर्डाने त्यांचे आवाहन करणारे निवेदन मागे घेतले आहे. पशु कल्याण मंडळाचे सचिव एसके दत्ता यांनी आवाहन मागे घेतलं असल्याचं सांगितलं. त्यांनी म्हटलं की, डेअरी आणि पशु पालन मंत्रालयाकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. आम्ही पशु पालन विभाग काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहन मागे घेतो.
काऊ हग डे साजरा करण्याचं आवाहन केल्यानंतर याची जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षांकडून अशा प्रकारच्या आवाहनावर सडकून टीकाही करण्यात आली. शेवटी मंत्रालयाकडून बोर्डाला त्यांचे आवाहन मागे घेण्याचे आदेश देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cow science