मराठी बातम्या /बातम्या /देश /

Covid Alert: कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, मुंबईतील रूग्णांच्या संख्येत 80 टक्के वाढ

Covid Alert: कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, मुंबईतील रूग्णांच्या संख्येत 80 टक्के वाढ

मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या ऑगस्ट महिन्यात वाढली आहे. (PTI)

मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या ऑगस्ट महिन्यात वाढली आहे. (PTI)

कोरोना रूग्णांच्या (Covid-19) संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विशेषत: मुंबईत ही संख्या झपाट्यानं वाढत आहे.

    मुंबई, 11 ऑगस्ट : कोरोना रूग्णांच्या (Covid-19) संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विशेषत: मुंबई आणि दिल्लीत हा धोका पुन्हा वाढला आहे. मुंबईमध्ये बुधवारी (10 ऑगस्ट) 852 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एक जुलैनंतरची ही सर्वाधिक दैनिक रुग्णसंख्या आहे. तसंच, बुधवारी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूचीही नोंद झाली. त्यामुळे मुंबईतल्या आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11 लाख 29 हजार 285 झाली असून, आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे एकूण 19 हजार 661 जणांचा मृत्यू झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ही माहिती दिली. एक जुलै 2022 रोजी मुंबईत 978 नव्या कोरोनाबाधितांची, तसंच दोघांच्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर मुंबईतल्या कोरोनाबाधितांच्या दैनिक नव्या रुग्णसंख्येत हळूहळू घट होत गेली; मात्र ऑगस्ट महिन्याचे पहिले दोन दिवस वगळता नंतर दररोज किमान 400 नवे कोरोनाबाधित मुंबईत आढळत आहेत. 9 ऑगस्टला 476 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. 24 तासांत त्या संख्येत 79 टक्के वाढ नोंदवली गेली. 10 ऑगस्ट रोजी 852 नवे कोरोनाबाधित मुंबईत आढळले. 10 ऑगस्टच्या या नव्या 852 रुग्णांपैकी केवळ 36 रुग्णांना लक्षणं दिसत असून, 816 जणांना कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. या 24 तासांत मुंबईत 9670 कोरोना चाचण्या केल्या गेल्या. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या एक कोटी 79 लाख 4 हजार 139 एवढी झाली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ नोंदवली जात असल्याचं यावरून दिसून येतं. मुंबईत सध्या सक्रिय (अ‍ॅक्टिव्ह) अर्थात उपचार सुरू (Active Corona Patients) असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 3545 झाली असल्याचं बृहन्मुंबई महापालिकेच्या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे. दिल्लीत मृतांच्या संख्येत वाढ देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीतही (Delhi) कोरोनाबाधितांच्या संख्येत, तसंच मृतांच्या संख्येत वाढीचा ट्रेंड दिसत आहे. कोव्हिड-19मुळे ऑगस्ट महिन्यात दिल्लीत आतापर्यंत 40 मृत्यू झाले आहेत. जुलैच्या अखेरच्या 10 दिवसांच्या तुलनेत मृतांच्या संख्येतली ही जवळपास तिप्पट वाढ आहे. जुलैच्या अखेरच्या 10 दिवसांत 14 जणांचा मृत्यू झाला होता. 10 ऑगस्टला 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, गेल्या 180 दिवसांतला एकाच दिवसातल्या मृत्यूंचा हा सर्वाधिक आकडा आहे. दिल्लीत आतापर्यंत 26 हजार 351 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, दिल्लीत कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं दिसत असलं, तरी त्यापैकी बहुतांश रुग्णांना कॅन्सर, टीबी किंवा अन्य आजार (Co-Morbidites) होते, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यानं दिली आहे. Omicron Sub-Variant : दिल्लीत ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरियंट; लस घेतलेल्यांनाही करतोय बाधित पुन्हा संसर्ग होणाऱ्यांचं, तसंच लसीकरण झालेल्यांनाही संसर्ग होण्याचं प्रमाण गेल्या आठवड्यात जास्त असल्याचं दिसून आल्याचं फोर्टिस हॉस्पिटलच्या सीनिअर कन्सल्टंट रिचा सरीन यांनी सांगितलं. हे ओमिक्रॉनच्या BA.2 सबव्हॅरिएंटमुळे असावं, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. वृद्ध, तसंच अन्य आजार असलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, संख्या वाढत असली, तरी पॅनिक होण्याचं कारण नसल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, कोरोना आणि हंगामी आजारपणांमुळे मुलांचं आरोग्य धोक्यात असल्याचा इशारा सर गंगाराम हॉस्पिटलच्या बाल-अतिदक्षता विभागाचे संचालक अनिल सचदेव यांनी दिला आहे. मुलांची योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
    First published:

    Tags: Covid19, Delhi, Mumbai

    पुढील बातम्या