नवी दिल्ली, 11 एप्रिल : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, अमेरिका या देशांमध्ये मृतांचा आकडा प्रत्येकी 15 हजारांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात अनेक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये भारतात कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनबद्दलही स्पष्ट करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याबद्दल अहवालात चूक झाल्याचं म्हटलं आहे. ही चूक सुधारण्यात आली असून भारतात क्लस्टर ऑफ केसेस म्हणजेच कोरोनाच्या रुग्णांच प्रमाण जास्त असलं तरी कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालेलं नाही असं म्हटलं आहे. जगात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 16 लाखांच्या वर आहे. तर मृतांचा आकडा एक लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोनाच्या जगभरातील आक़डेवारीची माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेकडून एक चूक झाली. अहवालामध्ये चीनच्या नावासमोर क्लस्टर ऑफ केसेस असं लिहिण्यात आलं तर भारताच्या नावासमोर कम्युनिटी ट्रान्समिशन लिहिलं होतं. भारत सरकारकडून कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं नसल्याचं ठामपणे सांगण्यात आलं. भारतात कोरोना तिसऱ्या स्टेजमध्ये पोहोचला नसल्याचं केंद्राने स्पष्ट केलं. कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे,कोरोना व्हायरसची प्रकऱणं वाढत जातात आणि त्यामध्ये कोरोनाचा स्रोत शोधणं कठीण होतं. भारतात आतापर्यंत 7400 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हे वाचा : औरंगाबादेत दुहेरी संकट, ‘कोरोना’सोबतच आढळले ‘सारी’चे 15 रुग्ण जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या स्टेजची माहिती सदस्य देशांकडून दिली जाते. यामध्ये कोणतीही प्रकरणं नाहीत, तुरळक प्रकरणं, रुग्णांचे प्रमाण जास्त आणि कम्युनिटी ट्रान्समिशन यांचा समावेश असतो. चीनमध्ये पहिल्यांदा अज्ञात कारणामुळे झालेला न्यूमोनिया च्या पहिल्या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर काही काळातच जगात पसरला. कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची माहिती समोर येण्याच्या घटनेला शुक्रवारी 100 दिवस पूर्ण झाले. हे वाचा : मुंबईकरांनो सावधान! आणखी 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू तर 189 रुग्ण पॉझिटिव्ह संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.