नवी दिल्ली, 21 मार्च : भारत सध्या एका कठीण प्रसंगाशी दोनहात करत आहे. कोरोना या विषाणूने भारतात दहशत पसरली आहे, याला वेळीच रोखणे सरकार पुढे आव्हान आहे. यासाठी सरकार सध्या विविध उपाययोजना करत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 मार्च रोजी एक दिवसासाठी ‘जनता कर्फ्यू (Janta Curfew)’ करण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी यावेळी सर्वांना एक दिवस घरात राहण्यास सांगितले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूमध्ये लोकांना संपूर्ण एक दिवस घरात राहावे लागणार आहे. लोकांनीही मोदींच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र भारतात हा असा प्रकार घडण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही एका पंतप्रधानांच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण देश उपाशी राहिला होता. हा प्रसंग घडला होता लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान असताना. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान पद स्वीकारले. नेहरूंच्या निधनानंतर लगेचच देशावर आर्थिक ग्रहण आले होते. त्याच वेळी 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. अशा कठीण परिस्थितीत लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे देशाचे नेतृत्व होते. याच काळात देशात अन्नसाठ्याची कमतरता जाणवू लागली. उपासमारीच्या या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी एक अनोखे पाऊल उचलले, जे आजही कौतुकास्पद आहे. शास्त्री यांनी या समस्येचा सामना स्वत:चा पगार थांबवला. एवढेच नाही तर इतर खर्च कमी करण्यासाठी स्वत:ची कामे ते स्वत: करू लागले. या सगळ्यात शास्त्रींनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. जेव्हा अमेरिकेनेही अन्नधान्याची निर्यात भारतात रोखण्याची धमकी दिली. तेव्हा शास्त्रींनी लोकांना दिवसांतून केवळ एक वेळा जेवण्याचे आवाहन केले. अन्न वाचवण्यासाठी त्यांनी जनतेला सहकार्य करण्याची विनंती केली. याच काळात अमेरिकेने काही काही अटींच्या जोरावर भारताला धान्य देण्याची ऑफर दिली होती. मात्र लाल बहादूर शास्त्री यांना हे ठाऊक होते की अमेरिकेतून धान्य घेतले तर देशाचा स्वाभिमान संपुष्टात येईल. त्यामुळे शास्त्री यांनी स्वत: अन्नत्याग करून लोकांनाही एक उपवास करण्यास सांगितले. शास्त्रींनी जवळजवळ 54 वर्षांपूर्वी घेतलेल्या या निर्णयाची आठवण प्रत्यय मोदींच्या जनता कर्फ्यूनंतर येते. सध्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारताला एकत्रितपणे या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.