कठुआ, 09 एप्रिल : कोरोनाशी लढा द्यायला सर्व भारतीय एक झाले आहेत. लॉकडाऊननंतर लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत अनेकांना एकवेळचं जेवण मिळत नाही. यासाठीच जम्मूतील एका गावाने अनोखा आदर्श समोर ठेवला आहे. कठुआ जिल्ह्यातील बोरथॅन नॉर्थ पंचायतीनं एक प्रस्ताव मंजूर केला आहे. यानुसार गावातील गर्भवती महिली, वयोवृद्ध आणि लहान मुलं वगळता सर्व लोकांनी एक वेळ जेवायचं नाही.
पंचायतीच्या सदस्यांनी प्रस्ताव मंजुर करताना पूर्ण लॉकडाऊन पाळण्याचा निश्चय केला आहे. यासाठी प्रभागानुसार यावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ग्रामीण भागात शेतीतलं पीक काढण्यासाठी लोक एकमेकांना मदत करतील. याबाबत सरपंचांनी सांगितलं की, गावातील सदस्यांची सोशल डिस्टन्सिंगबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये सदस्य आणि गावकऱ्यांच्या संमतीनं अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
ग्रामपंचायतीला सरकारवर कोणताही ताण येऊ द्यायचा नाही. यासाठी त्यांच्याकडून जमेल तेवढं करण्यात येईल. गावातील सर्व कुटुंबिायंनी त्यांचे धान्य गरजेपुरतं वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच गर्भवती महिला, वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुलं यांच्या व्यतिरिक्त इतर लोक एक वेळचं जेवण सोडणार आहेत. गावातील 80 टक्के लोक शेती करतात. त्या लोकांचे एकवेळचे धान्यही वाचेल आणि सरकारकडून अतिरिक्त मदत लागणार नाही. गावातील दोन हजार लोक यामध्ये सहभागी होणार आहेत.
हे वाचा : Lockdown: युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुलाने घरीच केली वडील आमदारांची कटिंग
गावातील बऱ्याच लोकांची शेती आहे. त्यांच्या शेतातलं पीक काढणीसाठी एकमेकांना मदत केली जाणार आहे. तसंच लवकर काम उरकलं जाईल आणि ज्यांना रोजगार नसेल त्यांनाही मदत होईल या दृष्टीनेही पंचायतीनं निर्णय घेतला आहे.
हे वाचा : मुंबईतल्या आजीबाईंनी केली कमाल, 82व्या वर्षी केली कोरोनावर मात
संपादन - सुरज यादव