बापरे! कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहामुळे 12 पेक्षा अधिक जणांना व्हायरसची लागण, एक चूक पडली महागात

बापरे! कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहामुळे 12 पेक्षा अधिक जणांना व्हायरसची लागण, एक चूक पडली महागात

कोरोना (coronavirus) संशयित असलेल्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट येण्याआधीच मृत्यूनंतर त्याचा मृतदेह (deadbody) कुटुंबाला सोपवण्यात आला.

  • Share this:

प्रतीक अवस्थी, जबलपूर, 28 एप्रिल : कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या जिवंत रुग्णापासून व्हायरसच्या संक्रमणचा धोका जितका आहे, तितकाच त्याच्या मृतदेहापासूनही (deadbody) असू शकतो. जर कोरोनाव्हायरस रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करताना आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर एक चूकही महागात पडू शकते. अशीच घटना घडली आहे ती मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये.

जबलपूरमध्ये (Jabalpur) एका कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाला. त्या रुग्णाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट येणं बाकी होतं. मात्र रिपोर्ट येण्याआधीच तिचा मृतदेह कुटुंबाला सोपवण्यात आला आणि याचा परिणाम म्हणजे एका कोरोना रुग्णाच्या मृतदेहामुळे 12 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. एका चुकीमुळे असं घडलं. अशा बेजबाबदारपणामुळए

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मृत्यूनंतरच्या या बेजबाबदारपणाला जिल्हा प्रशासनाने गांभीर्यानं घेतलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आता सिव्हिल सर्जनला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. शिवाय मृतदेहाचं योग्य व्यवस्थानप व्हावं यासाठी गाइडलाइन तयार करण्यास सुरुवात केली आहे.

हे वाचा - प्रत्येक कोरोनामुक्त व्यक्ती कोरोनाग्रस्तासाठी करू शकत नाही रक्तदान, या आहेत अटी

न्यूज 18 लोकमतशी बोलताना महाराष्ट्र IMA चे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, "मृतदेहामध्ये कोरोनाव्हायरस किती काळ राहतो याबद्दल अजून संशोधकांना अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. आजमितीला रुग्ण मृत्यू पावल्यावर त्यापासून विषाणूंचा संसर्ग इतरांना होतो किंवा नाही, याबद्दल खात्रीपूर्वक माहिती नाही. त्यामुळे मृतदेहाचा अंत्यविधी करताना घ्यायची काळजी महत्वाची ठरते. यासाठी काही संकेत जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारने प्रसिद्ध केले आहेत"

हे वाचा - कोरोनामुळे 30 लाखांपेक्षा जास्त बळी जाणार, 100 कोटी लोकांना लागण होण्याचा धोका

१) मृतदेह इस्पितळातून पाठवताना स्वच्छ आणि निर्जंतुक कपड्यांमध्ये किंवा बॉडीबॅगमध्ये पूर्ण गुंडाळून पाठवावा. ही बॉडीबॅग कुठेही फाटलेली नसावी. त्यातून पाणी किंवा द्रव पदार्थ बाहेर जाणार नाही अशी असावी. कोरोना संसर्गाने मृत झालेल्या व्यक्तीच्या, नाकातोंडातून असे द्राव मरणोत्तर अवस्थेतही शरीराबाहेर येत राहण्याची शक्यता असते.

२) मृतदेहाला सजवणं, अंघोळ घालणं, त्याचं चुंबन घेणं, मिठी मारणं, त्यावर काही धार्मिक विधी करणं, त्याला स्पर्श करणं या गोष्टी प्रकर्षानं टाळाव्यात. मात्र देहाभोवती बसून धार्मिक पठण किंवा स्पर्श न करता मंत्रोच्चार केलेले चालतील.

३) दहनभूमीच्या कर्मचाऱ्यांच्या सह्याने शेवटचं दर्शन घेण्यासाठी बॉडीबॅगचे तोंड 5 मिनिटं उघडं ठेवता येईल.

४) मृतदेहाचं शवविच्छेदन करू नये. जर अतिशय आवश्यक असेल तरच सर्वतोपरी प्रतिबंधक उपाय करून शवविच्छेदन करावं.

५) अंत्ययात्रेसाठी गर्दी होऊ देऊ नये. मृताच्या नातेवाईकांमध्ये हा आजार असण्याची शक्यता असतं. मृतदेहामध्ये विषाणू किती काळ राहतो, याबद्दल अजून संशोधकांना अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या देहाचं दफन न करता दहन करावं असा संकेत आहे.

६) मृतदेहाला उचलणाऱ्या आणि त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणाऱ्या व्यक्तींनी आणि दहनभूमीच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण बाह्यांचा, संपूर्ण शरीराला झाकणारा, विल्हेवाट लावण्याजोगा (डिस्पोझेबल) अंगरखा, मास्क आणि ग्लोव्हज वापरावेत.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 28, 2020, 5:23 PM IST

ताज्या बातम्या