नवी दिल्ली, 3 एप्रिल : देशात कोरोनाव्हायरसचा धोका आणखी वाढला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत Coronavirus मुळे 12 मृत्यू झाले आणि 336 नवे कोरोनाग्रस्त दाखल झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाते अधिकारी लव अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली. देशात कोरोनाबळींची संख्या 56 झाली आहे.
दिल्लीच्या निजामुद्दीन इथे झालेली तबलिगी मरकज देशाभरात कोरोनाव्हायरचा हॉटस्पॉट ठरली आहे. या संमेलनात सहभागी झालेले अनुयायी तिथून देशभर हा संसर्ग घेऊन गेले आणि आता अनेक राज्यांमधून या तबलिगी अनुयायांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 14 राज्यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित 647 कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. हा आकडा गेल्या दोन दिवसातला आहे. या नव्या कोरोनाग्रस्तांमुळे देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्याही एकदम वाढली आहे.
From yesterday till today 336 additional cases of #COVID19 have come before us. Total confirmed cases are 2301, 56 deaths have been reported: Lav Agarwal, Joint Secretary Health Ministry pic.twitter.com/qdOeCO9Uao
कालपासून 336 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे देशातला कोरोनाग्रस्तांचा आकडा 2301 झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 56 मृत्यू देशभरात झाले आहेत. त्यातले 12 गेल्या 24 तासांतले आहेत. आतापर्यंत 157 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झालेले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. महाराष्ट्रात कोरोनाबळींची संख्या आणि कोरोनाग्रस्तांचा आकडा सर्वाधिक आहे.